दोन हजारांच्या नोटा गेल्या कुठे?
By admin | Published: June 28, 2017 12:26 AM2017-06-28T00:26:16+5:302017-06-28T00:26:16+5:30
निश्चलनीकरणानंतर व्यवहारात आलेल्या दोन हजारांच्या नोटा अवघ्या ७ महिन्यांतच दिसेनाशा होत आहेत.
बँकांना पडला प्रश्न : दहाचे बंडल घेण्यास ग्राहकांचा नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निश्चलनीकरणानंतर व्यवहारात आलेल्या दोन हजारांच्या नोटा अवघ्या ७ महिन्यांतच दिसेनाशा होत आहेत. बँकेच्या काउंटरवर दोन हजारांच्या नोटा दिसत नसून केवळ १०, ५० रुपयांच्या नोटांची बंडले घेण्यास ग्राहक नाक मुरडत आहेत. मात्र, दोन हजारांच्या नोटा पुन्हा धनदांडग्यांनी राखून ठेवल्या का, असा प्रश्न बँक कर्मचाऱ्यांसह, सामान्य ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे.
ग्राहकांना विड्रॉल करताना काही दोन हजारांच्या तर काही पाचशे, शंभरच्या नोटाही मिळू लागल्या. परंतु, सध्या बँकांच्या काउंटरवर दोन हजारांच्या नोटाच नसल्याचे चित्र आहे.
एक-एक लाखाचे विड्रॉलही शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात दिले जात आहेत. अनेक ग्राहकांना तर ५० हजारांचा विड्रॉल चक्क दहा-दहा रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात स्वीकारावा लागत आहे. एवढ्या नोटा बाळगणे जिकीरीचे असल्याने ग्राहक दोन हजारांच्या नोटा मागतात, पण कॅशिअर दहाच्याच नोटा देतो. त्यातून बँकांमध्ये भांडणे उद्भवत आहेत.
बँकेतून विड्रॉलमध्ये एका दिवसात दोन हजारांच्या १०० नोटा दिल्या गेल्या, तर त्यातील ६० टक्के नोटा पुन्हा बँकेकडे येतात, असा बँक कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. पण सध्या बाहेर गेलेल्या नोटांपैकी १०-२० टक्के नोटाच पुन्हा बँकेकडे येत आहेत. त्यातून बँकेत दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला.