जेथे वरात न्यायची होती, तेथून निघाली अंत्ययात्रा...
By admin | Published: April 16, 2017 01:04 AM2017-04-16T01:04:08+5:302017-04-16T01:04:08+5:30
आठ दिवसानंतर ज्या गावात लग्नाची वरात घेऊन जायचे होते, त्याच गावातून नियोजित नवरदेवाची ‘अंतिम यात्रा’ काढण्याची दुर्दैवी वेळ ....
खासगी लाईनमन : लग्नापूर्वीच सासुरवाडीत मृत्यू
शिवानंद लोहिया हिवरी
आठ दिवसानंतर ज्या गावात लग्नाची वरात घेऊन जायचे होते, त्याच गावातून नियोजित नवरदेवाची ‘अंतिम यात्रा’ काढण्याची दुर्दैवी वेळ दारव्हा तालुक्यातील राऊत परिवारावर ओढविली. वीज खांबावर चढून दुरुस्ती करणाऱ्या संजय राऊत या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे घडली.
दारव्हा तालुक्यातील संजय बाबाराव राऊत (२५) रा. देऊरवाडी याचा विवाह काही दिवसांपूर्वीच यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील तरूणीसोबत जुळला. येत्या २३ एप्रिल रोजी हिवरी येथे हा विवाह समारंभ थाटामाटात पार पडणार होता. संजय खासगी लाईनमन म्हणून काम करायचा. कामानिमित्ताने तो नेहमीच विविध गावांमध्ये जायचा. अशातच शनिवारी नियोजित सासूरवाडी हिवरी येथे लाईन दुरुस्तीकरिता तो आला होता. तो वीज खांबावर चढून दुरुस्ती करीत होता. दरम्यान, सकाळी ११ वाजताच्या सुमारास विजेचा जबर धक्का लागून संजयचा मृत्यू झाला. यावेळी मुलीचे आई-वडील लग्नाच्या कापड खरेदीसाठी गेले होते.
आठवडाभरानंतर हिवरी येथून संजयच्या लग्नाची वरात निघणार होती. मात्र, शनिवारी त्याच गावात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही वार्ता कळताच गावकरी आणि संजयच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. वरातीऐवजी संजयचे कलेवर घेऊन त्यांना ‘अंतिम यात्रे’ची तयारी करावी लागली. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आला. यवतमाळ येथून संजयचे कलेवर नेताना देऊरवाडी व हिवरी येथील अनेक आप्तांनी एकच हंबरडा फोडला. संजयच्या मृत्युमुळे या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
एक महिन्यापासून संजय लाईनमनसोबत राहात होता. कोणती लाईन कुठून कुठे गेली, कोणते स्वीच बंद केल्याने कोणती लाईन बंद होते, याची पुरेपूर माहिती त्याला नव्हती. त्याने गावठाण फिडर बंद करायचे, तर एजे स्वीच बंद करून गावठाण फिडरवर चढला. त्यामुळे हा प्रकार घडला असावा.
- चेतन एन. मोहकर,
वीज उप कार्यकारी अभियंता, आर्णी