कुठे आहे कॉपीमुक्त अभियान? खिडकीतून कॉपी बहाद्दरांना केला जातोय पुरवठा
By अविनाश साबापुरे | Published: March 11, 2024 08:11 PM2024-03-11T20:11:48+5:302024-03-11T20:12:30+5:30
दहावी, बारावी परीक्षांचे व्हीडिओ व्हायरल : दारव्हा, दिग्रस तालुक्यात लक्ष कुणाचे?
यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान चक्क पोलिस आणि शिक्षकांच्या नजरेपुढे कॉपी पुरविण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत. खिडकीतून परीक्षावर्गात कॉपीचा कागद फेकला जात असल्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभाग मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानासाठी नेमलेली भरारी पथके आहेत तरी कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.
पांढरकवडा तालुक्यातील केंद्रावर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिका अवघ्या काही मिनिटात सोशल मीडियात व्हायरल झाली होती. या प्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. तर दारव्हा तालुक्यातील चिखली येथील वसंत नाईक हायस्कूल या केंद्रावरील व्हीडिओ व्हायरल झाला. शाळेला संरक्षक भिंत नाही. वर्गखोल्यांच्या खिडक्या थेट रस्त्यावर आहे. याचाचा फायदा घेऊन या ठिकाणी काही जण परीक्षार्थींना कॉपी पुरवित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकारानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने येथील केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावली.
तसेच पोलीस संरक्षण घेऊन कॉपीला आळा घालावा आणि काही जण गोंधळ घालत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दिग्रस तालुक्यातील रुई तलाव परीक्षा केंद्रातही कॉपीमुक्त अभिनायाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. ७ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर सुरू असताना कॉपी पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची गर्दी या केंद्राबाहेर हजर होती. चक्क शाळेच्या कंपाऊंडवर चढून, खिडकीत लटकून विद्यार्थ्यांना कॉप्या पुरविल्याचा व्हीडिओ काही नागरिकांनी व्हायरल केला आहे.
हा सर्व प्रकार केंद्र प्रमुख यांच्या उपस्थितीत होतांना सुद्धा केंद्र प्रमुखांनी या प्रकारावर आळा घालण्याऐवजी या कडे दुर्लक्ष केल्याने कापी बहाद्दरांनी सर्व नियम मोळून आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांला कॉपी पोहचविण्यासाठी जीव मुठीत धरून कॉप्या पुरविल्या. पांढरकवडा, दिग्रस, दारव्हा यासह इतरही तालुक्यांमध्ये बऱ्याच केंद्रांवर कॉपी पुरविण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. हे प्रकार केंद्रावरी बैठे पथक, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, केंद्र प्रमुख यांच्या निदर्शनास कसे येत नाही, हा प्रश्न आहे. तर शिक्षण विभागाने नेमलेले सहा भरारी पथके नेमक्या याच केंद्रांवर का पोहोचत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बोर्ड मंजुरी देते तरी कोणत्या आधारावर?
जिल्ह्यात यंदा ज्या केंद्रांवर काॅपीचा सुळसुळाट आढळत आहे, त्याच केंद्रांवर मागील वर्षीही काॅपी बहाद्दरांची गर्दी दिसली होती. असे असताना परीक्षा मंडळाने याच शाळांना यंदा दुसऱ्यांदा परीक्षा केंद्र कोणत्या आधारावर मंजूर केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र मंजूर करण्यापूर्वी शाळेला संरक्षक भिंत, बैठक व्यवस्था, आसन क्षमता, संलग्न गावांचे अंतर यासह विविध निकषात अनेक केंद्र बसत नाहीत. तरीही त्यांना मंजुरी का दिली जाते? त्यामागे आर्थिक हितसंबंध असल्याची जोरदार चर्चा आहे.
चिखली येथील परीक्षा केंद्रावर एक दिवस गोंधळ उडाल्याच्या तक्रारीनंतर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पोलीस संरक्षण घेऊन परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
- विलास जाधव, गटशिक्षणाधिकारी, दारव्हा