वेणी धरणाचे दहा कोटी अडले कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:20+5:30
लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे.
ज्ञानेश्वर ठाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस-वेणी धरणाचे पाणी टेलपर्यंत नेण्याची पाटबंधारे विभागाची धडपड अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याकरिता गेल्यावर्षी नऊ कोटी ७८ लाख रुपये मंजूर झाले. मात्र हा निधी अद्यापही पाटबंधारे विभागाला मिळाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाची शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी नेण्याची धडपड व्यर्थ होताना दिसत आहे.
लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे. लोअरपूसचे पाणी टेलपर्यंत पोहोचल्यास आणखी दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.
लोअरपूस-वेणी धरणाची सिंचन क्षमता सहा हजार ६०० हेक्टर असल्याचे सांगितले जाते. मात्र टेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्यामुळे दरवर्षी केवळ साडेचार हजार हेक्टरवरच सिंचन होते. यामुळे हा मंजूर निधी शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला असता. टेलपर्यंत पाणी नेण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर शेतकºयांनी विविध आंदोलने केली होती. मात्र ही समसया अद्याप अधांतरीच आहे. तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने यांनी विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील देशमुख यांच्यासह बैठक घेऊन नऊ कोटी ७८ लाखांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा मिळाल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. मात्र वर्ष लोटूनही हा निधी मिळाला नाही.
कॅनाल, मायनरचे काम रखडले
मंजूर निधीतून कॅनाल आणि मायनरचे काम करण्याची योजना आखण्यात आली होती. यावर्षीच्या पावसाळ्यानंतर या कामाला गती येण्याची शक्यता होती. मात्र मंजूर निधी मिळाला नसल्याने या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असल्याचे वेणी धरणाचे शाखा अभियंता योगेश अंबीलवादे यांनी सांगितले. मात्र अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. सध्या लोअरपूसचा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाई भासणार नसून रब्बी हंगामात चांगल्या प्रकारे सिंचन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.