जिथे अधिक व्हायचे तिथे आता होत आहे सगळेच उणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 01:50 PM2020-07-04T13:50:18+5:302020-07-04T13:53:09+5:30
विदर्भात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात कोसळतो. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हमखास पाऊस बरसणारा प्रांत म्हणून यवतमाळची राज्यात ओळख आहे. अस्मानी संकटाने यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांची ही ओळख पुसून काढली आहे. कमजोर मान्सूनने या जिल्ह्याचा घात केला आहे. मान्सूनमध्ये भरपूर पाऊस असणाऱ्या ठिकाणी आता उणे नोंद झाली आहे.
विदर्भात सर्वाधिक पाऊस कोसळतो. त्यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. याठिकाणी वर्षभरात सरासरी ९५० मिमी पावसाची नोंद होते. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात बरसणारा हा पाऊस लहरी स्वरूपाचा झाला आहे. हवामान अभ्यासकांनी या घटनेला ‘विक मान्सून’ जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
या स्थितीत ढगाचे अल्प प्रमाण असते. वाऱ्याचा वेग ताशी ३ ते ४ किमी असतो. हवेत बाष्प नसते. यामुळे काही पॅचमध्ये हा पाऊस पडतो. तर काही ठिकाणी पडत नाही. वाºयाचा वेग ताशी ४० ते ५० असेल आणि बाष्प घेऊन येणारे समुद्राचे वारे असेल तर पाऊस हमखास बरसतो. तशी स्थितीत विदर्भावर निर्माण होण्याची प्रक्रिया गत दोन वर्षात प्रारंभीच्या काळात मंदावली आहे. या ठिकाणावरून मान्सूनचे वारे ‘डिव्हाईड’ होत आहे. इतर ठिकाणी मान्सूनच्या वाऱ्याचा वेग तीव्र आहे.
संपूर्ण जून महिना संपला, मात्र पावसाची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. १७ दिवसांपासून पावसाचा खंड आहे. परिणामी यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या उणे ३३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात सरासरीच्या उणे २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. गोंदियाला उणे २४ टक्के पाऊस झाला आहे. वर्धेत ८ टक्के कमी पाऊस आहे. चंद्रपूरमध्ये १२ टक्के कमी, गडचिरोलीत १२ टक्के कमी, तर साताऱ्यात ८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पालघरमध्ये उणे ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे. ठाण्यात २६ टक्के कमी पाऊस झाला आहे. मुंबई शहरात सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला. रायगडमध्ये २२ टक्के कमी पाऊस झाला.
आता या कमी पावसाने कृषी क्षेत्र अडचणीत आले आहे. पीक नाजूक अवस्थेत आहे. अशा स्थितीत उन्हाचा पारा ३६ अंशापर्यंत वर चढला आहे. तर पीक मान टाकत आहे. यामुळे शेतकरी १७ दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा खंड पडत होता. आता विदर्भ आणि मुंबईच्या क्षेत्रात पावसाचा खंड पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हवामानाचा पुन्हा अंदाज खरा ठरेल काय?
हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ३, ४ आणि ५ जुलैला पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी वर्तविलेला पावसाचा अंदाज फेल ठरला आहे. यामुळे यावेळचा अंदाज नक्की खरा ठरेल काय, यावर साशंकता व्यक्त होत आहे.
सहा जिल्ह्यात क्षमतेपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस
सहा जिल्ह्यात क्षमतेच्या ६० टक्के अधिक पाऊस पडला आहे. यामध्ये औरंगाबाद, जालना, अहमदाबाद, बिड, सोलापूर, लातूर या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडला आहे. १२ जिल्ह्यात २० टक्के अधिक पाऊस पडला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि वाशिममध्ये चांगल्या पावसाची नोंद २ जुलैला हवामान विभागाने केली आहे. ६ जिल्ह्यात जेमतेम पाऊस पडला आहे. यामध्ये अमरावती, नांदेड, नागपूर, भंडारा, रत्नागिरी आणि नंदूरबार जिल्ह्याचा समावेश आहे.
विदर्भाला विक मान्सूनचा फटका बसला आहे. पुढील तीन दिवस चांगला पाऊस वेधशाळेने वर्तविला आहे. कमी पावसाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला.
- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक