लग्न असो वा सभा, अडीचशेतच भागवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 05:00 AM2021-12-27T05:00:00+5:302021-12-27T05:00:40+5:30

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी हे नवे निर्बंध जारी केले. यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. याशिवाय दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या विविध समारंभातील उपस्थितीच्या प्रमाणावरही निर्बंध घालण्यात आले आहे.

Whether it is a wedding or a meeting, run for half an hour | लग्न असो वा सभा, अडीचशेतच भागवा

लग्न असो वा सभा, अडीचशेतच भागवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मध्यंतरी थंडावलेला कोरोना जिल्ह्यासह राज्यातही पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय लग्न व अन्य सभा-समारंभातील उपस्थितीवरही मर्यादा घालण्यात आली आहे. 
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी हे नवे निर्बंध जारी केले. यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. याशिवाय दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या विविध समारंभातील उपस्थितीच्या प्रमाणावरही निर्बंध घालण्यात आले आहे. स्थानिक परिस्थिती पाहून या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचे संकेतही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. 

असे राहतील निर्बंध 

- लग्न सोहळे : मंगल कार्यालय किंवा बंदिस्त हाॅलमध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्यात शंभरपेक्षा जास्त उपस्थिती नसावी, तर खुल्या जागेत होणाऱ्या लग्न समारंभात २५०  किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्केच उपस्थिती असावी. 
- राजकीय-धार्मिक कार्यक्रम : सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम बंदिस्त हाॅलमध्ये असल्यास तेथेही केवळ शंभर जणांनाच उपस्थित राहता येईल. कार्यक्रम मोकळ्या जागेत घेतल्यास २५० किंवा क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीची मर्यादा राहणार आहे. 
- क्रीडा स्पर्धा : खेळ, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना मैदानावर किंवा स्टेडियममध्ये प्रेक्षक संख्येच्या २५ टक्केच उपस्थितीची परवानगी आहे.
- अन्य कार्यक्रम : राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच लग्न सोहळ्यांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांच्या बाबतीत बंदिस्त सभागृहासाठी ५० टक्के तर खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी २५ टक्के उपस्थितीची मर्यादा आहे. 
- हाॅटेल, सिनेमा हाॅल : हाॅटेल, रेस्टाॅरन्ट, योगा सेंटर, स्पा, सिनेमा हाॅल आदी ठिकाणी आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी आहे. या आस्थापनांनी त्यांच्या आसन क्षमतेची माहिती दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. 

रविवारी जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण

यवतमाळ : जिल्ह्यात रविवारी आणखी तीन कोरोना रुग्णांची भर पडली. हे तिघेही यवतमाळ येथील रहिवासी असून त्यात एका महिलेसह दोन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान रविवारी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून सध्या १३ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण ६३८ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित ६३५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ हजार ९७८ आहे. तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७१ हजार १७७ आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १७८८ मृत्यूची नोंद आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ८० हजार ६९० चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख सात हजार ६५४ निगेटिव्ह आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.३५ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी ०.४७ आहे, तर मृत्यूदर २.४५ आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांसाठी १७६९ बेड उपलब्ध असून त्यातील १७६६ बेड रिकामे आहे. ही परिस्थिती गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. मात्र संसर्ग १०० टक्के संपलेला नाही. त्यामुळे अजूनही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

निर्बंध वाढविण्याचे प्रशासनाचे संकेत 
- सध्या दिवसाच्या कालावधीत मर्यादित प्रमाणात सर्व व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहे. केवळ रात्री जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध वाढविण्याचे संकेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. 
 

Web Title: Whether it is a wedding or a meeting, run for half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.