सिंचन तलाव ठरला पांढरा हत्ती

By admin | Published: September 15, 2016 01:21 AM2016-09-15T01:21:26+5:302016-09-15T01:21:26+5:30

शेतात सिंचन करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी, यासाठी उत्तरवाढोणा येथे निर्माण करण्यात आलेला सिंचन तलाव पांढरा हत्ती ठरत आहे.

White elephant became a irrigation lake | सिंचन तलाव ठरला पांढरा हत्ती

सिंचन तलाव ठरला पांढरा हत्ती

Next

जागोजागी लिकेज : उत्तरवाढोणा परिसरातील सिंचन थांबले, तक्रारी व सूचनांकडे दुर्लक्ष
पांडुरंग भोयर सोनखास
शेतात सिंचन करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी, यासाठी उत्तरवाढोणा येथे निर्माण करण्यात आलेला सिंचन तलाव पांढरा हत्ती ठरत आहे. जागोजागी लिकेज असल्याने या तलावात पाणी थांबत नाही. या पावसाळ्यात हा तलाव ओव्हर फ्लो झाला. मात्र त्यातील अर्धेअधिक पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मूळ उद्देशाला मूठमाती मिळत आहे.
सिंचन विभागाने १९७२-७३ मध्ये नऊ हेक्टर तलावाची निर्मिती केली. शेतकऱ्यांना या तलावाचे पाणी घेता यावे यासाठी कालवे काढण्यात आले. काही वर्षांपर्यंत सुस्थितीत राहिलेले हे कालवे पूर्णत: बुजले. तसेच अनेक ठिकाणी कालव्यावर बांधण्यात आलेले सिमेंट पूलही खचले. तलावाची भिंतही लिकेज आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी घेण्यापासून वंचित राहात आहे.
या पावसाळ्यात सदर तलाव ओव्हर फ्लो झाला होता. मात्र सद्यस्थितीत या प्रकल्पामध्ये केवळ ५० टक्के पाणी आहे. तलावाच्या दुरावस्थेविषयी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचन उपविभाग दारव्हा तसेच या विभागाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. शेतकरी तथा माजी सरपंच रामूजी चावरे यांनी हा प्रश्न सदर विभागाकडे मांडला. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. गाळाने बुजलेला आणि दुरुस्तीवर आलेला हा तलाव उपयोगात यावा यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
सदर प्रकल्पाच्या आधारे अनेक शेतकरी बारमाही पीक घेत होते. यासाठी विविध साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली होती. यावर लाखो रुपये खर्च त्यांनी केला. आता मात्र पाणी उपलब्ध होत नसल्याने या वस्तू अडगळीत पडलेल्या आहेत. सदर सिंचन प्रकल्पाची दुरुस्ती झाल्यास अनेक शेतकरी त्याद्वारे सिंचन करू शकतात. यासाठी संबंधितांकडून प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.

दीड लाख मत्स्यबीज धोक्यात
उत्तरवाढोणा सिंचन तलाव मत्स्य व्यवसायासाठी भारतीबाबा मत्स्य व्यवसाय संस्थेला पाच वर्षांसाठी देण्यात आला आहे. या तलावात संस्थेने एक लाख ५० हजार बोटुकले आणि मत्स्य जिरा टाकल्या आहे. परंतु तलावातून पाणी वाहून जात आहे. लवकरच तलाव कोरडा पडण्याची शक्यता असल्याने मत्स्यबीज धोक्यात येण्याची भीती आहे. भारतीबाबा मत्स्य व्यवसाय संस्थेने पाच वर्षांपूर्वीही सदर तलावाच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. त्यावेळी सिंचन उपविभागाने पाहणी केली. पण, दुरुस्तीसाठी उपाययोजना केल्या नाहीत.

Web Title: White elephant became a irrigation lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.