लिंबाच्या फांदीतून निघतोय पांढरा द्रव
By admin | Published: August 14, 2016 01:02 AM2016-08-14T01:02:40+5:302016-08-14T01:02:40+5:30
तालुक्यातील विठोली मारोती येथे लिंबाच्या फांदीतून पांढऱ्या रंगाचा गोड द्रव गेल्या चार दिवसांपासून निघत आहे.
दिग्रसमध्ये नवल : गावकऱ्यांनी पूजा करून दिले पंगतीचे जेवण
दिग्रस : तालुक्यातील विठोली मारोती येथे लिंबाच्या फांदीतून पांढऱ्या रंगाचा गोड द्रव गेल्या चार दिवसांपासून निघत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नवल व्यक्त केले जात आहे. गावकऱ्यांनी झाडाची पूजा करून पंगतीचे जेवणही दिले.
माहिती मिळताच गावकऱ्यांनी शिवसेना विभाग प्रमुख उमेश राऊत यांना घटनास्थळी नेले. त्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली. सतत चार दिवस हा पांढरा द्रव निघत आहे. गावकऱ्यांनी फांदीला बादली बांधून त्यामध्ये द्रव साठविणे सुरू केले आहे. गावात या झाडाची पूजाअर्चना सुरू असून महापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तालुक्यातील चिंचोली क्र.२ येथे लिंबाच्या झाडातून असाच द्रव निघाला होता. तेव्हा झाड रडत असल्याची अफवा पसरली होती. शिवसेना विभाग प्रमुख उमेश राऊत, उपसरपंच प्रकाश जाधव, गणेश ढोबरे, रमेश जाधव, उल्हास जाधव तसेच गावातील लोकांनी वर्गणी करून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. (लोकमत चमू)