महागावातील रेती साठ्याला अभय कोणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:40+5:302021-07-15T04:28:40+5:30
चोरीच्या रेतीचा फुलसांवगी, धनोडा, भोसा, दहिसावळी आदी ठिकाणी हजारो ब्रासचा साठा करून ठेवण्यात आला आहे. हे रेतीसाठे महसूल, खनिकर्म ...
चोरीच्या रेतीचा फुलसांवगी, धनोडा, भोसा, दहिसावळी आदी ठिकाणी हजारो ब्रासचा साठा करून ठेवण्यात आला आहे. हे रेतीसाठे महसूल, खनिकर्म आणि पोलीस प्रशासनाला आव्हान ठरत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली; परंतु त्यांची दिशाभूल करून या अवैध व्यवसायातील उत्पन्नाचे पाट दुसऱ्याच कार्यालयात मुरत असल्याचे बोलले जात आहे.
साकूर-१ रेती घाट लिलाव झाला. तेथील नदीपात्राची शासनाने दिलेली हद्द सोडून भोसा सर्व्हेमधून अवैधरीत्या सेक्शन पंपाव्दारे (बोट) व जेसीबी मशीनव्दारे रेतीचे उत्खनन व अवैध वाहतूक केली जात आहे. शासनाने निर्धारित केलेल्या वेळेनुसार वाहतूक होत नाही. रात्री अवैध उत्खनन होत आहे. या प्रकारामध्ये तहसीलदारांची मूक संमती तर नाही ना, असा प्रश्न तक्रारीतून उपस्थित केला आहे. यात शासनाचा महसूल बुडत आहे. पावती दोन ब्रासची असताना चार ते पाच ब्रास जास्त रेती अवैधरीत्या वाहतूक होत आहे.
रेतीसाठ्याला संरक्षण देण्याकरिता संबंधितांनी तहसीलदारांमार्फत सर्वांच्या मुसक्या आवळल्याची माहिती या व्यवसायातील जाणकार खुलेआम बोलत आहे. तालुक्याचा कारभार प्रभारी तहसीलदारांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तहसील कार्यालय प्रभारावर जाणीवपूर्वक ठेवले जात आहे. परिणामी गौण खनिज उत्खनन दंड वसुलीची अनेक प्रकरणे धूळ खात पडून आहेत. दंड वसुली होत नसल्यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
बॉक्स
प्रभारामागे दडलीय गोम
जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक लायक तहसीलदार खितपत पडले आहेत. महागावसारखा तालुका मात्र प्रभारावर ठेवला जात आहे. याचे अनेकांना नवल वाटत आहे. या प्रभारामागेच खरी गोम दडली असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
कोट
रेतीसाठ्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. महागाव तहसीलदारांना कारवाई करण्यास सांगितले आहे.
- प्रमोदसिंग दुबे,
अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ