जिल्ह्यातून ‘कॅबिनेट’पदी बढती कुणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 08:56 PM2019-06-07T20:56:35+5:302019-06-07T20:57:41+5:30

भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे.

Who is going to increase the cabinet from the district? | जिल्ह्यातून ‘कॅबिनेट’पदी बढती कुणाला ?

जिल्ह्यातून ‘कॅबिनेट’पदी बढती कुणाला ?

googlenewsNext
ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्ताराचे वेध : मदन येरावार की संजय राठोड?, लोकसभेतील ‘परफॉर्मन्स’ उपयोगी ठरणार

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे.
युती सरकारची साडेचार वर्ष संपली. परंतु अलिकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या झालेल्या घोषणा केवळ फार्स ठरल्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराचे फारसे कुणाला अप्रूप राहिलेले नाहीत. कित्येकांनी तर आता या विस्ताराचा नादही सोडला आहे. काहींना हे पद मिळाले तरी नका आहे, तीन महिन्यात काय ‘परफॉर्मन्स’ दाखवायचा असा त्यांचा सवाल आहे. आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात भाजपकडून मदन येरावार तर शिवसेनेकडून संजय राठोड राज्यमंत्री आहेत. या दोघांपैकी कुणाला कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे कार्यकर्ते येरावारांना तर शिवसैनिक राठोडांना कॅबिनेट पक्के असल्याचे सांगत आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्याकडील अन्न व औषधी प्रशासन या खात्याची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मदन येरावार यांच्याकडे कालपर्यंत सोपविण्यात आली होती. ते पाहता त्यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. मंत्र्यांना बढती मिळते की केवळ त्यांच्याकडील खात्यांमध्ये फेरबदल केला जातो, हे पाहणेही महत्वाचे ठरते.
राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील ‘परफॉर्मन्स’ पाहिला जाणार असल्याचे सांगितले जाते. त्याचा विचार केल्यास शिवसेनेच्या भावना गवळी यांना यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून ३७ हजार मतांची आघाडी देणारे भाजपचे मदन येरावार ‘प्लस’ ठरतात. शिवसेनेचे संजय राठोड यांनीही आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून भावनातार्इंना मतांची आघाडी मिळवून दिली. परंतु २०१४ च्या तुलनेत ही आघाडी साडेआठ हजाराने कमी झाली आहे. इकडे यवतमाळात ३७ हजारांच्या मतांच्या आघाडीत शिवसेनेचाच वाटा अधिक आहे, भाजप सक्रिय नव्हते असा दावा सेनेच्या गोटातून केला जात आहे. तर तिकडे दिग्रसमध्ये भावनातार्इंना मिळालेल्या मतांच्या आघाडीत भाजपचाही समान वाटा असल्याचे कार्यकर्ते सांगत आहे. अशीच स्थिती उमरखेड मतदार संघात आहे. त्यामुळे कुठे कुणी कुणाचे काम केले हा राजकीय दृष्ट्या संशोधनाचा विषय ठरला आहे.
वणीतील ‘परफॉर्मन्स’ अदखलपात्र
वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना लोकसभेत भाजप उमेदवारासाठी केवळ दोन हजार मतांची आघाडी खेचून आणता आल्याने त्यांचा ‘परफॉर्मन्स’ पक्षाच्या नजरेत अदखलपात्र ठरतो आहे. गेल्या वेळी भाजप उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या आघाडीत वणीमध्ये ५० हजारांवर मतांनी घट झाली आहे. त्यामुळे आमदार बोदकुरवार यांचा ‘परफॉर्मन्स’ ‘मायनस’मध्ये जात असल्याचे स्पष्ट आहे.
उमरखेड, आर्णीचाही परफॉर्मन्स जोरदार
केवळ लोकसभेतील कामगिरीचा विचार केल्यास उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने, आर्णीचे आमदार राजू तोडसाम हेसुद्धा सरस ठरतात. कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला अनुक्रमे ४२ हजार व ५७ हजार मतांची आघाडी मिळवून दिली.
आदिवासी कोट्यातून अशोक उईकेंची चर्चा
राळेगावचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांचेही नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. मात्र आदिवासी समाजातील विद्यमान नावात काही फेरबदल करायचे झाले तरच उईकेंचा प्राधान्याने विचार होऊ शकतो, असे सांगितले जाते. या लोकसभा निवडणुकीत भावनातार्इंचे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील गतवेळचे सर्व पाठीराखे यावेळी उघडपणे काँग्रेससोबत असतानाही सेनेला २८ हजार मतांची आघाडी मिळाली. यात उईके यांचा मोठा वाटा आहे. लोकसभेतील त्यांची ही कामगिरी मंत्रीपदावरील वर्णीच्या दृष्टीने महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर शिवसेनेची नजर
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा विजयी झाल्या. मोदी लाटेने त्यांना यावेळीही तारले. ज्येष्ठ खासदारांमध्ये वरच्या क्रमांकावर असल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र यावेळी ‘२० खासदारांमागे एक मंत्रीपद’ असा कोटा भाजपने ठरविल्यामुळे सेनेच्या वाट्याला केवळ एक मंत्रीपद आले आणि तेही मुंबईत स्थिरावले. लगतच्या भविष्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही व संख्याबळामुळे सेनेच्या वाट्याला आणखी मंत्रिपद येण्याची शक्यता कमीच आहे. सेनेने आता लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर दावा ठोकला आहे. या पदावर ज्येष्ठ असलेल्या भावनातार्इंची वर्णी लागते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मला मंत्रीपद नको, मी पक्षातच काम करणार असे भावनाताई सांगत आहेत. मग त्यांची दिल्लीत मंत्रिमंडळ स्थापने दरम्यान अनुपस्थिती व नाराजी कशासाठी असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तार्इंना किमान उपाध्यक्षपद तरी द्यावे, अशी त्यांच्या समर्थक शिवसैनिकांची भावना आहे.

Web Title: Who is going to increase the cabinet from the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.