दिग्रसच्या सभापतीपदी वर्णी कुणाची?
By admin | Published: February 26, 2017 01:18 AM2017-02-26T01:18:38+5:302017-02-26T01:18:38+5:30
सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या सभापतीपदासाठी कुणाची वर्णी लागते याकडे दिग्रसवासीयांचे लक्ष लागले आहे.
पंचायत समिती : शिवसेनेला हवी एका जागेची मदत, काँग्रेसची भूमिका निर्णायक
दिग्रस : सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या सभापतीपदासाठी कुणाची वर्णी लागते याकडे दिग्रसवासीयांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला केवळ तीन जागा मिळाल्या आहे. परंतु. ६ संख्येच्या सभागृहामध्ये बहुमताकरिता शिवसेनेला एक जागा कोण देऊ करते याबाबत उत्सुकता आहे.
पंचायत समितीमध्ये शिवसेनेला ३ जागा व भाजपाला २ जागा, काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. वरिष्ठ पातळीवर जर भाजपा-शिवसेनेची युती झाली तर प्रश्नच उद्भवणार नाही. परंतु, हे दोन पक्ष एकत्र न आल्यास शिवसेनेला काँग्रेसची साथ घेण्याशिवाय पर्यायच नाही. परंतु काँग्रेस शिवसेनेला सभापती निवडीसाठी समर्थन देईलच हे सांगता येणार नाही. पण २०१२ च्या निवडणुकीमध्येही शिवसेना तीन व काँग्रेस तीन असे पक्षीय बलाबल होते. सभापती निवडीदरम्यान शिवसेनेला दोन्ही वेळा ईश्वरचिठ्ठीने तारले होते. जर पंचायत समितीमध्ये भाजपाने काँग्रेसच्या उमेदवाराचे समर्थन प्राप्त केल्यास पुन्हा सभापती निवडीसाठी ईश्वरचिठ्ठी काढावी लागणार आहे. परंतु भाजपा व काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. कारण माजी राज्यमंत्री संजय देशमुख नुकतेच काँग्रेस सोडून भाजपामध्ये सामील झाले. तर शिवसेनला काँग्रेस व भाजपा यांना एकत्र येऊ द्यायचे नसल्यास काँग्रेसला तटस्थ ठेवावे लागणार आहे. यामध्ये उपसभापती पदसुद्धा काँग्रेसला द्यावे लागेल. केशव राठोड, विनोद जाधव, अनिता राठोड हे शिवसेनेचे विजयी उमेदवार असून, तिघेही सभापती पदासाठी सक्षम आहेत. यामध्ये केशव राठोड अनुभवी आणि तालुक्यातून भरपूर मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)