दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना संरक्षण कुणाचे ?
By admin | Published: April 26, 2017 12:13 AM2017-04-26T00:13:07+5:302017-04-26T00:13:07+5:30
संपूर्ण यवतमाळ शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू असताना दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना मात्र संरक्षण दिले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
सर्रास खंडणी वसुली : वाहतुकीस अडथळा, अपघात वाढले
यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू असताना दारव्हा रोडवरील अतिक्रमणांना मात्र संरक्षण दिले जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
दारव्हा रोडवर पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरचे अतिक्रमण हटविले गेले. मात्र बुलडोजर त्यापुढे सरकला नाही. त्या मार्गावर अजूनही अतिक्रमण कायम आहे. हॉटेलांच्या आडोश्याने अतिक्रमणे थाटली गेली आहेत. तेथे आॅटोरिक्षा चालकांकडून काही टपोरी युवक खंडणी वसुली करतात. या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आपले अतिक्रमण कुणीच काढू शकत नाही, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या या अतिक्रमणधारकांना नगरपरिषदेतील यंत्रणेतूनच संरक्षण मिळत असल्याची माहिती आहे. त्याबळावरच आजही हे अतिक्रमण कायम आहे. हे अतिक्रमण व त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत दारव्हा रोडवरील व्यावसायिकांनी नगरपरिषद प्रशासनाची भेट घेतली. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी साकडे घातले जात आहे. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येक मोहिमेच्या वेळी आज काढू, उद्या काढू अशी उत्तरे देऊन अतिक्रमण हटविणे टाळत आहेत. त्यामुळे त्या वादग्रस्त अतिक्रमणांना नगरपरिषद प्रशासनाची तर साथ नाही ना असा शंकेचा सूर दारव्हा रोडवरील व्यावसायिकांमधून ऐकायला मिळतो आहे. दारव्हा रोडवर दूरपर्यंत ही अतिक्रमण मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पाठफिरविताच पुन्हा अतिक्रमण बसविले जाते. अनेकदा संरक्षणामुळे खानापूर्ती म्हणून अतिक्रमण काढले जाते. हे प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे. दारव्हा रोडवर विशिष्ट अतिक्रमणांना संरक्षण देण्याचा प्रकार उघड झाला असला तरी हाच प्रकार शहराबाहेर जाणाऱ्या अन्य मार्गांवरही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने अशा प्रकरणात नगरपरिषदेमधील नेमके कुणाचे अतिक्रमणधारकांशी लागेबांधे आहेत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)