यवतमाळ अर्बन बँकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेमके कोण?
By Admin | Published: January 10, 2016 02:54 AM2016-01-10T02:54:03+5:302016-01-10T02:54:03+5:30
१८०० कोटींच्या ठेवी असलेल्या यवतमाळ अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेची १० जानेवारी रविवार रोजी संचालकांच्या १६ जागांसाठी निवडणूक होत आहे.
\मतदारांत संभ्रम: आज निवडणूक, ७३ हजार मतदार, १३३ केंद्र
यवतमाळ : १८०० कोटींच्या ठेवी असलेल्या यवतमाळ अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेची १० जानेवारी रविवार रोजी संचालकांच्या १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यातील ७३ हजार ५७० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सहकार व समन्वय असे दोन पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेमके पॅनल कोणते, असा संभ्रम तमाम मतदारांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भाऊसाहेब मारोडकर व सुशिल कोठारी यांच्या नेतृत्वात समन्वय पॅनल, तर बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनोहर देव यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल निवडणूक रिंगणात आहे. सहकार पॅनल हे खास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र संघ, भाजपाच नव्हेतर विहिंप, बजरंग दलाची बहुतांश मंडळी समन्वय पॅनलच्या गर्दीत दिसत असल्याने संघाचे खरे पॅनल कोणते, असा प्रश्न कार्यकर्तेच एकमेकांना विचारताना दिसत आहेत. सहकार पॅनलसाठी अनिछेने का होई ना भाजपाची नेतेमंडळी प्रयत्नरत आहे. मात्र त्यांचे खास-खंदे कार्यकर्ते या नेत्यांचा माग सोडून पर्यायी व सहज उपलब्ध होणाऱ्या, तत्काळ कामात पडणाऱ्या समन्वय पॅनलच्या प्रचार मंडपात दिसत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने संघ, भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या काही नेत्यांना या निवडणुकीचे फार सोयरसूतक नाही. मात्र भविष्यात आपल्या लालदिवा, मंडळ-महामंडळावर त्याचा इफेक्ट होऊ नये म्हणून शरीराने ही मंडळी संघाच्या सतरंजीवर दिसत असल्याचे राजकीय गोटात बोलले जाते. संघाने विविध मार्गांनी गोंधळ निर्माण केल्याने अखेर यवतमाळ अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेत ‘जुने तेच सोने’ मानण्याच्या मानसिकतेप्रत मतदार आले आहे. संघाने अखेरच्या क्षणी खेळलेल्या खेळीने हजारो सैनिक व एक मोठा समाज नाराज झाला आहे.
राज्यात १३३ केंद्रांवरून मतदान होणार आहे. यातील सर्वाधिक ३४ केंद्र एकट्या यवतमाळात आहे.