‘साईड ब्रँच’चे पोलीस बंदोबस्ताला का नाहीत? थकलेल्या पोलिसांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:22 PM2020-05-22T19:22:27+5:302020-05-22T19:22:48+5:30
महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध साईड ब्रँचमध्ये शेकडो पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना काम नाही, यातील ५० वर्षाच्या आत असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरावावे अशी मागणी पोलीस यंत्रणेतूनच पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध साईड ब्रँचमध्ये शेकडो पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना काम नाही, यातील ५० वर्षाच्या आत असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरावावे अशी मागणी पोलीस यंत्रणेतूनच पुढे आली आहे.
विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन व संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उभे आहेत. त्यापैकी काहींना जीव गमवावा लागला. तर कित्येकांना कोरोनाची बाधा झाली. तासन्तास उन्हातान्हात आणि कोरोनाग्रस्त भागात जीव धोक्यात घालून ते ड्युट्या करीत आहे. परंतु सततच्या बंदोबस्तामुळे हे पोलीस थकले आहेत. त्यामुळे त्यांना पर्याय हवा आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केंद्रीय राखीव पोलीस दलाची मागणी केली. औद्योगिक सुरक्षा दलाच्या अनेक कंपन्या राज्यात तैनात झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी व लिपिकवर्गीय यंत्रणेला बाहेर काढून कोरोनाशी संबंधित कामे त्यांंना देण्यात आली आहे. यानिमित्ताने पोलीस दलातील साईड ब्रँचची सध्या बसून असलेली यंत्रणा चर्चेत आली आहे.
एसीबी, बीडीडीएसला कामच नाही
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), लाचलुतपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), नागरी हक्क संरक्षण विभाग (पीसीआर), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) या सारख्या अनेक साईड ब्रँच पोलीस दलात आहेत. तेथे अनेक अधिकारी-कर्मचारी आहेत. काही कर्मचारी तर आठ ते दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी जणू ‘मुक्कामी’ आहेत. शासकीय कार्यालये बंद असल्याने लाच मागण्याचे प्रकार कमी आहेत. त्यामुळे एसीबीला सध्या काम नाही. सीआयडीकडे तसेही वर्षानुवर्षे तपासाच्या निमित्ताने प्रकरणे प्रलंबित असतात. लॉकडाऊन काळात आणखी महिना दोन महिने प्रकरणे प्रलंबित राहतील. ‘बीडीडीएस’लाही काम नाही.
कोरोना संकटात तरी युनिफॉर्म लावा
या सर्व साईड ब्रँचमधील ५० वर्षाच्या निकषात बसणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरविले पाहिजे, अशी दोन महिन्यांपासून सतत बंदोबस्त करून थकलेल्या पोलिसांची मागणी आहे. साईड ब्रँचचे हे सर्व अधिकारी-कर्मचारी कायम सामान्य वेशात राहतात. किमान आता कोरोनासारख्या संकटाच्यावेळी तरी त्यांना पोलिसांचा युनिफॉर्म घालण्याची संधी द्यावी, असा सूर आहे.
शिपाई-जमादार बनले लिपिक
अशीच अवस्था पोलीस महासंचालक कार्यालयात आहे. शासनाने मंत्रालयातील यंत्रणा बाहेर काढली. त्याच धर्तीवर महासंचालक कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कोरोनाच्या कामात त्यांची सेवा घ्यावी, अशी मागणी आहे. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, कमांडंट व त्यांच्या अधिनस्त विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पोलीस शिपाई-जमादारच लिपिकाचे काम करतात. त्यांनाही बंदोबस्तासाठी बाहेर काढण्याची मागणी होत आहे.