‘एलसीबी’ला दूरचे दिसते जवळचे का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 09:33 PM2019-05-31T21:33:58+5:302019-05-31T21:34:33+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०० किलोमीटरवर जाऊन दराटी येथील जुगार धाड यशस्वी केली. तेथून पावणेसहा लाखांंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. २०० किलोमीटरवरचे धंदे हुडकून काढणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला यवतमाळ शहरात त्यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आणि खुलेआम चालणारे वरली मटका अड्डे का दिसू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०० किलोमीटरवर जाऊन दराटी येथील जुगार धाड यशस्वी केली. तेथून पावणेसहा लाखांंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. २०० किलोमीटरवरचे धंदे हुडकून काढणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला यवतमाळ शहरात त्यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आणि खुलेआम चालणारे वरली मटका अड्डे का दिसू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची सूत्रे अद्यापही पडद्यामागून दुसरेच कुणी तरी आॅपरेट करीत असल्याचे बोलले जाते. एलसीबीचे ‘रिमोट’ नेमके कुणाच्या हातात याची चर्चा पोलिसांमध्ये होताना दिसते. अधिनस्त एपीआय-पीएसआयकडून काही डिटेक्शन होत असले तरी एलसीबीकडून धुमधडाक्यात कामगिरी अद्याप दिसली नाही.
आव्हानात्मक ‘परफॉर्मन्स’ची अपेक्षा
रिव्हॉल्वर तस्करी, साठेबाजी यातील राजकीय अभय लाभलेल्या टोळीच्या सदस्यांचा पर्दाफाश करणे, क्रिकेट सट्ट्याच्या सूत्रधारांना हातकड्या घालणे या सारखा आव्हानात्मक ‘परफॉर्मन्स’ची अपेक्षा एलसीबीकडून आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एलसीबी प्रमुखांनी राजकीय भीती न बाळगता चौकट सोडून काम करणे अपेक्षित आहे. परंतु त्यांची ‘राज’मार्गाने झालेली नियुक्ती पाहता ते चौकटीबाहेर निघण्याची शक्यता कमीच आहे. पर्यायाने शस्त्र तस्करी, क्रिकेट सट्टा यातील सूत्रधार सध्यातरी बिनधास्त आहेत. पोलीस यंत्रणेतील बहुतांश घटकांना त्यांनी आपल्या ताटा खालचे मांजर बनवून ठेवले आहे. त्यामुळेच त्यांची पोलिसात चालती आहे.
जवळचे सोडून दूरवर धाडी का?
एलसीबीने दोन दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील दराटी या दूरवरच्या गावात जुगार धाड यशस्वी करून आपली पाठ थोपटून घेतली आहे. त्याचवेळी धाड घालायला एलसीबीचे पथक एवढ्या दूर गेलेच कशाला असा उपरोधिक सवालही पोलीस वर्तुळातच उपस्थित केला जात आहे. एलसीबी कार्यालयाच्या अवतीभोवतीच मोठ्या प्रमाणात वरली मटका आणि तोही खुलेआम सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. शारदा चौक, रेल्वे स्टेशन, आठवडी बाजार, अप्सरा टॉकीज, पांढरकवडा रोड, कॉटन मार्केट, भोसा रोड आदी अगदी हाकेच्या अंंतरावरील अनेक स्पॉट सोडून एलसीबीने २०० किलोमीटरवर जाऊन कामगिरी दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. दूरचे दिसणाºया एलसीबीला जवळचे दिसत नसावे का असा प्रश्न विचारला जात आहे.
गोळीबार फेमही ठरले ‘फेल’
एक आरोपी, एक शस्त्र आणि आठ-दहा पोलीस असा ‘कामगिरी’चा फोटो माध्यमांना पाठविला जातो. प्रत्यक्षात या शस्त्र तस्करीतील मुख्य सूत्रधार, साठेबाज आणि त्यांना राजकीय अभय देणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची हिंमत आजपर्यंत तरी कोणत्याच पोलीस अधिकाºयाने दाखविलेली नाही. छुटपुट गुन्हेगारांवर गोळीबार करणारेही त्यात फेल ठरल्याचे आतापर्यंतच्या कामगिरीवरून दिसते.
रेल्वे स्टेशनवर ‘वास्तव’ टिपूनही ना जाब, ना कारवाई?
यवतमाळ शहरात राजरोसपणे चालणाºया या अवैध धंद्यांना प्रशासनाचे तर संरक्षण नाही ना?, असा प्रश्नार्थक सूरही ऐकायला मिळतो आहे. कारण लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या निमित्ताने रेल्वे स्टेशन परिसरात अचानक पोलिसांची वाहने पाहून खेळणाºयांची झालेली पळापळ प्रशासनाने स्वत: आपल्या नजरेने टिपली. मात्र त्याबाबत ना कुणाला जाब विचारला गेला, ना कुणावर कारवाई झाली. आजही रेल्वे स्टेशनचा तो परिसर पुन्हा तेवढाच गजबजलेला पहायला मिळतो आहे. यावरून प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेभोवतीही प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
सूत्रधारांना मिळते सुरक्षा कवच
पोलिसांच्या अनेक शाखा पांढरकवडा रोड स्थित मुख्यालयातील इमारतींमधून चालतात. या मुख्यालयापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर मटका-जुगार, अग्नीशस्त्रे, अंमलीपदार्थांची तस्करी, गुटखा तस्करी या सारखे धंदे चालविले जातात. मात्र त्या धंद्यातील मूळ सूत्रधारांवर कारवाई करणे नेहमीच टाळले जाते. कधी या धंदेवाईकांकडून संधी दिली गेलीच तर छुटपुट कुणावर तरी कारवाई करून पोलीस आपली खानापूर्ती करतात. या पडद्यामागील सूत्रधारांवर कारवाईचे आव्हान पोलिसांपुढे आहे.