कशाला जाता परराज्यात, उच्च शिक्षणाची गुणवत्ता महाराष्ट्रात
By अविनाश साबापुरे | Published: May 29, 2023 10:07 AM2023-05-29T10:07:33+5:302023-05-29T10:07:54+5:30
देशात सर्वाधिक नॅक मूल्यांकन प्राप्त महाविद्यालये आपल्याच राज्यात
अविनाश साबापुरे
यवतमाळ : प्राथमिक शिक्षणात अव्वल परफाॅर्मन्स ग्रेडिंग इन्डेक्स (पीजीआय) मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचाही दर्जा देशात सर्वांत चांगला आहे. ‘नॅक’ मानांकन मिळविणारी सर्वाधिक महाविद्यालये महाराष्ट्रातच असल्याची बाब नॅकच्याच अहवालातून पुढे आली आहे. आतापर्यंत देशातील ८ हजार ६८६ महाविद्यालयांना हे मानांकन मिळाले असून, त्यात राज्यातील सर्वाधिक १,८३४ महाविद्यालये, ३५ विद्यापीठांचा समावेश आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेमार्फत (नॅक) दर पाच वर्षांनी महाविद्यालयांतील सोयी-सुविधा आणि शैक्षणिक दर्जा निश्चित करण्यासाठी मूल्यांकन केले जाते. त्यानंतर महाविद्यालयांना व विद्यापीठांना श्रेणी दिली जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाने १९९४ मध्ये निर्माण केलेली नॅक ही स्वायत्त संस्था बंगळुरू मुख्यालयातून कारभार पाहते. ८ ऑक्टोबर २०१०च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनानेही महाविद्यालयांनी मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे अनिवार्य केले.
पाच वर्षांतून एकदा मूल्यांकन होत असले तरी ॲन्युअल क्वालिटी अशुअरन्स रिपोर्ट (एक्यूएआर) नॅक कार्यालयाकडे दरवर्षाला पाठवावा लागतो. याकडे बहुतांश महाविद्यालयांकडून दुर्लक्ष होते. त्याची दखल घेत महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण संचालनालयाने २३ मे रोजी महाविद्यालयांना तंबी दिली आहे. अहवाल न दिल्यास २०२३-२४ या सत्रातील प्रवेशावर बंदी घालण्यासह विद्यापीठाची संलग्नताही रद्द करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या कठोर भूमिकेमुळेच देशात सर्वाधिक मानांकन प्राप्त महाविद्यालयांची संख्या नॅकच्या अहवालात आली आहे, हे विशेष.
विद्यापीठांचीही बाजी : आतापर्यंत देशातील ४०६ विद्यापीठांनी हे मूल्यांकन मिळविले आहे. त्यातील ४३ विद्यापीठे तामिळनाडूतील, ३७ उत्तराखंडचे, ३५ विद्यापीठे महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर कर्नाटक ३३, राजस्थान ३१, गुजरात २३, दिल्ली १८, मध्य प्रदेश १७, पश्चिम बंगाल १६, हरयाणा १६, आंध्र प्रदेश १५, तेलंगणा १५, ओडिशा १४, उत्तराखंड ११, पंजाब १०, हिमाचल ९, तसेच केरळ, छत्तीसगड, बिहार, आसाममधील प्रत्येकी आठ विद्यापीठांनी मानांकन मिळविले. जम्मू - कश्मीर व झारखंडमध्ये प्रत्येकी ७, अरुणाचल प्रदेश ३, मेघालय, चंडीगड, पद्दुचेरी, सिक्कीम, त्रिपुरा प्रत्येकी २, तर गाेवा, मणिपूर, मिझोराम, नागालॅंडमध्ये प्रत्येकी एका विद्यापीठाला मानांकन आहे.