जिल्ह्यात विरोधी पक्ष गप्प का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:13+5:30

जिल्ह्यात विधानसभेचे पाच आणि विधानपरिषदेचे एक असे तब्बल सहा आमदार भाजपकडे आहेत. त्यानंतरही विरोधी पक्ष म्हणून भाजपची जिल्ह्यात धारदार कामगिरी दिसत नाही. या सहाही आमदारांच्या मतदारसंघात कोरोनाचा उद्रेक आहे. दरदिवशी कुठे पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत, तर कुठे मृत्यू होत आहेत. कोविड सेंटरमधील असुविधेबाबत सुरुवातीपासूनच रुग्णांमध्ये ओरड आहे.

Why is the opposition silent in the district? | जिल्ह्यात विरोधी पक्ष गप्प का ?

जिल्ह्यात विरोधी पक्ष गप्प का ?

Next
ठळक मुद्देकोविड सेंटरमधील अव्यवस्था : भाजपचे सहा आमदार, प्रशासनाला साधा जाबही विचारत नाहीत !

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यू आणि पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणच्या कोविड सेंटरमधील असुविधा, गैरसोय रुग्णांकडून जाहीररीत्या माध्यमांपुढे मांडली जात आहे. परंतु त्यानंतरही जिल्ह्यातील विरोधी पक्ष भाजपचे आमदार गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.
जिल्ह्यात विधानसभेचे पाच आणि विधानपरिषदेचे एक असे तब्बल सहा आमदार भाजपकडे आहेत. त्यानंतरही विरोधी पक्ष म्हणून भाजपची जिल्ह्यात धारदार कामगिरी दिसत नाही. या सहाही आमदारांच्या मतदारसंघात कोरोनाचा उद्रेक आहे. दरदिवशी कुठे पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत, तर कुठे मृत्यू होत आहेत. कोविड सेंटरमधील असुविधेबाबत सुरुवातीपासूनच रुग्णांमध्ये ओरड आहे. परंतु प्रशासन गुन्हा दाखल करेल या भीतीने कित्येकांनी या अव्यवस्थेबाबत ब्रसुद्धा काढला नाही. आता कोविड सेंटरमधील एकूणच वातावरण असह्य झाल्याने अखेर जागरुक नागरिक म्हणून रुग्णांनी सोशल मीडियावरून व्यथा मांडणे सुरू केले. डॉक्टर येत नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, प्रसाधनगृह सतत स्वच्छ होत नाही, चहा-नाश्ता, जेवण वेळेत मिळत नाही, कुणीच जबाबदारी घेत नाही आदी तक्रारी बाहेर आल्या. प्रशासन, आरोग्य यंत्रणा मात्र कोविड सेंटरमध्ये ‘आलबेल’ असल्याचे सांगते आहे. त्यामुळे नेमके खरे कोण असा प्रश्न आहे.
कन्टेन्मेंट झोन, कोविड सेंटर येथील अव्यवस्थेबाबत ओरड आहे. मात्र ती अद्याप भाजप आमदारांच्या कानापर्यंत पोहोचलीच नसावी. कारण सहा आमदार असून एकानेही या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरल्याचे ऐकिवात नाही. किमान ओरड असलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन प्रशासनाकडून लगेच आढावा घेण्याची तसदीही घेतली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात खरोखरच विरोधी पक्ष शिल्लक आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी आमदारांनी फेरफटका मारला, मात्र प्रशासनाच्या सुरातसूर मिसळून त्यांनीही आलबेल असल्याची पावती दिली. त्यामुळे कोविड सेंटरच्या गैरप्रकाराबाबत आता दाद नेमकी कुणाकडे मागावी असा प्रश्न आहे.

यवतमाळच्या कोविड सेंटरमधील असुविधांबाबत रुग्णांचे सोशल मीडियावर मनोगत वाचले. त्या अनुषंगाने ‘लोकमत’मधील बातमीही वाचली. आपण कोविड सेंटरला भेट देऊन प्रशासनाकडून आढावा घेऊ. नेमका कुठे काय घोळ आहे, खोटे कोण बोलते आहे याचीही शहानिशा केली जाईल.
- आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके
अध्यक्ष, अभ्यागत मंडळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

कोविड सेंटरची व्यवस्था उत्तमच हवी- येरावार
यवतमाळचे आमदार तथा माजी पालकमंत्री मदन येरावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कोविड सेंटरला मी भेटी दिल्या. पाठपुरावा सुरू असून आढावाही घेत आहे. अलिकडे रुग्ण वाढल्याने तेथे भेटीस मनाई करण्यात आली. तेथील संपूर्ण व्यवस्था योग्यच आहे, असे म्हणणार नाही. परंतु कोविड योद्धा योग्य काम करीत आहे. तेही मानव आहे, त्यांनाही जीवाची भीती आहे. जेवणाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी असतात, मग शिवसेनेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शिवालयातून दर्जेदार भोजन का दिले जात नाही. कोरोनातून अधिकारी, लोकप्रतिनिधी कुणीच सुटलेले नाही. त्यामुळे कोविड सेंटरमधील व्यवस्था उत्तमच असावी, मग रुग्ण कुणीही असो असे स्पष्ट निर्देश दिलेले असल्याचे आमदार मदन येरावार यांनी सांगितले.

Web Title: Why is the opposition silent in the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.