महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लपूनछपून शपथ का घ्यावी? यवतमाळ जिल्हातील प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 04:46 PM2019-11-23T16:46:15+5:302019-11-23T16:49:44+5:30
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ह्आम्ही कायम पवार साहेबांसोबतच असे ठासून सांगितले. तर शिवसेना, काँग्रेसने भाजपच्या खेळीची निंदा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल महिनाभरानंतर शनिवारी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वतृर्ळातही वादळ उठले. कुठे संताप, कुठे समाधान व्यक्त होत आहे. पण प्रतिक्रिया देताना अनेकांना सावध भूमिका घ्यावी लागली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही कायम पवार साहेबांसोबतच असे ठासून सांगितले. तर शिवसेना, काँग्रेसने भाजपच्या खेळीची निंदा केली. त्यातील या निवडक प्रतिक्रिया....
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीत लोकशाहीची पायमल्ली झाली. त्यांनी केंद्रात बैठक होऊन राष्ट्रपती शासन हटविले कधी, फडणवीसांनी दावा केला कधी या सर्व गोष्टी गुलदस्त्यातच आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचेच सरकार येईल.
- आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
आम्ही शरद पवार साहेब व राष्ट्रवादी पक्षासोबत आहोत. या घडामोडीनंतर पक्षाचे नेते जो काही निर्णय घेईल तो मान्य राहणार आहे.
- आमदार ख्वाजा बेग, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते अजीत पवार यांनी भाजपला दिलेला पाठिंबा ही अत्यंत चुकीची व दुदैर्वी घटना आहे. मी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच आहे. अजीत पवार यांच्यासोबत केवळ चार-पाच आमदार असून आलेल्या संकटाचा सामना करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे.
- अॅड.इंद्रनील नाईक, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप सत्तेसाठी पागल झाली आहे. विक्षिप्त प्रकार सुरू असून हे लोकशाहीच्या विरोधात आहे. सत्ता स्थापनेसाठी लोकशाहीत काही नितीनिर्देशक तत्व सांगितली आहे. त्याची पायमल्ली केली जात आहे. गोवा, मणिपूर, हरियाणा या काही राज्यांमध्ये भाजपने याच पद्धतीने सत्ता हस्तगत केली. मात्र महाराष्ट्रात भाजपची दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही.
- अॅड. शिवाजीराव मोघे, माजी मंत्री, काँग्रेस
लोकशाहीत जनता सार्वभौम शक्ती आहे. भाजपने जनतेच्या विश्वासाला सामोरे जाऊन सत्ता स्थापन करणे अपेक्षित होते. मात्र राजकारण हा एक खेळ आहे. तो कोण कसा खेळेल हे सांगता येत नाही. या घडामोडीत शेवटी लोकशाही मूल्य जपणे सर्वांचेच कर्तव्य आहे.
- प्रा. वसंत पुरके, माजी मंत्री, काँग्रेस
शिवसेनेने जे काही केले ते खुलेआम केले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भाजपने खेळलेली खेळी योग्य नाही. याचा महाराष्ट्रातील जनतेला मनस्ताप होत आहे. काहीही झाले तरी राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचेच सरकार येईल, असा विश्वास आहे.
- पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख शिवसेना
आम्ही शरद पवारांचे निष्ठावंत आहोत. संधीसाधूंचे समर्थन कदापी करणार नाही. भविष्यातही हीच भूमिका राहणार आहे.
- निमिष मानकर, माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद यवतमाळ
भाजपाने महाराष्ट्रातील जनतेची, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगारांची शुद्ध फसवणूक केली आहे. या राज्यकीय नाट्यामागे शरद पवारांचाच हात आहे. जे काही घडत आहे ते राज्याच्या विकासाला मारक आहे.
- अॅड. राजेंद्र महाडोळे, विदर्भ अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चोरी-लपीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, हे दुर्दैवी आहे. भाजपने सत्ता उजळ माथ्याने स्थापन करायला हवी होती. त्यांनी एकप्रकारे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. याची किंमत येत्या काळात त्यांना मोजावी लागणार आहे.
- रमेश गिरोळकर, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
शरद पवार साहेबांसोबत एकनिष्ठ आहोत. आज, उद्या त्यांच्याच नेतृत्वात काम करायचे आहे.
- आशीष मानकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
आम्ही पवार साहेब, सुप्रिया ताई यांच्या नेतृत्वात काम करतोय. काम करत राहणार. राष्ट्रवादीसोबत आहोत आणि भविष्यातही राहणार आहो.
- क्रांती राऊत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला आघाडी
राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून भाजपने सरकार स्थापनेचा प्रयत्न केला. ही बाब अभिनंदनीय आहे. देवेंद्रजी जे बोलले ते त्यांनी करून दाखविले आहे.
- अमन गावंडे, अध्यक्ष जिल्हा बँक, यवतमाळ
निकाल लागल्यावर कोणाचेही सरकार बनू शकणार नाही, अशी स्थिती होती. मग आता इतक्या सकाळी शपथविधी उरकण्याचे कारण काय असावे? राज्यपालांनी इतरांना आमदारांच्या सह्यांचे पुरावे मागितले. मग भाजपसाठी इतक्या सकाळी तत्परता दाखविण्याचे कारण काय? शिवाय आपली फाईल बंद व्हावी, हेच अजित पवार यांच्या सपोर्टचे कारण असावे. काकापेक्षा पुतण्या वरचढ निघाला.
- पी. डी. चोपडा, ज्येष्ठ सीए, यवतमाळ
एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणे शक्य नव्हते. पण कोणते पक्ष एकत्र येणार याबाबत अनिश्चितता होती. आता स्थिर सरकार मिळेल असे वाटते. भाजप आणि राष्ट्रवादी ज्या मुद्द्यांवर एकमेकांविरुद्ध लढले, त्याबाबत अपेक्षाभंग होईल. मात्र इतर अनेक प्रश्न मार्गी लागतील.
- प्रवीण गांधी, ज्येष्ठ सीए यवतमाळ
भाजप आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे आता सभागृहात बहुमत सिद्ध करतील का हा वादाचा मुद्दा आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ज्या काही घडामोडी घडतील, त्यावरच सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. पण या सर्व घडामोडींना शरद पवारांचीच तर मूकसंमती नसेल ना, अशीही शंका वाटते.
राजेश साबळे, ज्येष्ठ विधीज्ञ, यवतमाळ
सरकार स्थापन होणे हे चांगलेच आहे. युतीला जनाधार मिळाल्यावरही शिवसेनेने जी भूमिका घेतली, त्याचे परिणाम आज दिसत आहे. आज स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न झाला. त्याविना राज्याचा विकास शक्य नाही.
चेतन गांधी, ज्येष्ठ विधीज्ञ, यवतमाळ
मुळात ही राजकीय घडामोड धक्कादायक आहे. पक्ष, कायदा बाजूला ठेवून सरकार बनवायचेचे होते, तर या गोष्टी दिवसाच्या उजेडातही करता आल्या असत्या. या सर्व प्रकारात राज्यपालांची भूमिका संशयास्पद वाटते. जनतेची फसवणूक झाली आहे.
जयसिंह चव्हाण, यवतमाळ
भाजपा-शिवसेनेला जनमत मिळाले होते. पण काही कारणास्तव त्यांचे सरकार बनू शकले नाही. त्यामुळे पूर्वीच्या सरकारने सुरू केलेले अनेक प्रकल्प रखडण्याची भीती निर्माण झाली होती. पण आता देवेंद्रजींनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने आनंद झाला. वनउद्यान, मेट्रो, यवतमाळचा रेल्वेमार्ग असे अनेक प्रकल्प मार्गी लागतील.
- अजय मुंधडा, अध्यक्ष, यवतमाळ अर्बन बँक