सर्वच प्रकारचे मातृत्व सन्माननीय का मानू नये ?
By admin | Published: March 18, 2016 02:34 AM2016-03-18T02:34:16+5:302016-03-18T02:34:16+5:30
या जिल्ह्यातील कुमारी मातांचा प्रश्न राज्यभरात चर्चिला जात आहे. पण, सर्वच प्रकारचे मातृत्व सन्माननीय का मानू नये?
श्रीपाल सबनीस : कुमारी मातांचा प्रश्न अस्वस्थ करणारा, स्वतंत्र विदर्भानेही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही
अविनाश साबापुरे यवतमाळ
या जिल्ह्यातील कुमारी मातांचा प्रश्न राज्यभरात चर्चिला जात आहे. पण, सर्वच प्रकारचे मातृत्व सन्माननीय का मानू नये? विवाहितेचे मातृत्व सन्माननीय मानले जाते, तसे विधवेचे-कुमारिकेचे मातृत्व सन्मानीय का मानण्यात येत नाही, असा गंभीर प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला.
घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे आयोजित फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलनासाठी आले असता सबनीस यांनी ‘लोकमत’शी विविध विषयांवर बातचित केली. मागास समजला जाणारा समाजघटक आज कुमारी मातांचे, त्यांच्या मुलांचे पालनपोषण तरी करीत आहे. पण सुशिक्षित म्हणवून घेणारा समाज तर गर्भातच मुलींना मारतोय. मग खरे मागास कोण? कुमारी माता, भ्रूणहत्या या प्रश्नांकडे निकोप दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या आत्महत्या ही काही यवतमाळ जिल्ह्यासाठी भूषणावह बाब नाही. स्थानिक नेते आणि राज्य-केंद्र सरकारचा हा जसा पराभव आहे; तसाच तो समाजाचाही पराभव आहे. आज शेतकऱ्यांप्रती प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव होणे आवश्यक आहे. साहित्यातून शेतकऱ्यांविषयी आजवर अनेकदा लिहिले गेले. पण ते लिखाण त्या-त्या साहित्यिकाच्या कुवतीइतकेच होते. शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही पाहिजे तसे साहित्यातून उमटलेले नाही. जिथे तीन-तीन वर्षे हिरवळच पाहायला मिळत नाही, तेथे निसर्गकविता काय कामाच्या? असा प्रश्न श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. पाण्यासाठी जनावरांचे हाल होत आहेत. त्यांना बोलता आले असते तर एका-एका जनावराची एकेक महाकथा लिहिली गेली असती. आज शेतकऱ्यांच्या मरणाचे भांडवल केले जात आहे. नेते, कलावंत, साहित्यिक आणि प्रसिद्धीमाध्यमेही त्यातच स्वत:ची प्रतिष्ठा शोधत आहे, अशी टीका त्यांनी केली. आत्महत्या थांबविण्यासाठी तुटपुंजी आर्थिक मदत हा पर्याय नव्हे. त्यासाठी कायमस्वरुपी नियोजन हवे आहे आणि सरकार ते करू शकत नाही. त्यांना पाच वर्षे राहून पुन्हा सत्ता मिळवायची आहे. कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही नक्षलभत्ता मिळाला पाहिजे. अन्यथा आज मरणारेच उद्या मारायला उठतील. पण सध्या शासन स्वत:च भांडवलदार झाले. सरकारला टॅक्स हवा की माणसं? असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला.
वेगळा विदर्भ होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. देशाचे तुकडे करण्यापेक्षा सत्तेचे, पैशाचे, अधिकारांचे विकेंद्रीकरण करा. विदर्भवाद्यांबद्दल आपल्याला आदर आहे. पण वेगळ्या विदर्भाची चळवळ ही मोजक्या डोक्यांची चळवळ आहे. त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाला लुटले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच विदर्भाचा विकास करू शकते. त्यासाठी उपोषण करणार असाल, तर मीही तुमच्यासोबत येईल, असे सबनीस यांनी सांगितले.