लॉकडाऊनमध्ये बंद दुकानांमधून मागच्या दाराने सर्रास दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 05:00 AM2021-05-22T05:00:00+5:302021-05-22T05:00:02+5:30

अनेक बीअरबार, वाईनशाॅप, देशी दारू दुकाने, बीअर शाॅपी निर्बंधातही मागच्या दाराने चालविल्या गेल्या. तेथील दारूसाठा मोठ्या प्रमाणात व जादा दराने विकला गेला. त्यामुळेच गेल्या वर्षभरात एक्साईजला मिळणारा महसूल घटण्याऐवजी चक्क सव्वादोन कोटी रुपयांनी वाढला आहे. या वाढलेल्या महसुलातच दारूच्या अवैध मार्गाने विक्रीचे पुरावे दडले आहेत. 

Widespread liquor sales through closed doors from closed shops in the lockdown | लॉकडाऊनमध्ये बंद दुकानांमधून मागच्या दाराने सर्रास दारूविक्री

लॉकडाऊनमध्ये बंद दुकानांमधून मागच्या दाराने सर्रास दारूविक्री

Next
ठळक मुद्देमहसूल दोन कोटींनी वाढला : पोलीस-एक्साईजची कारवाई नाममात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेली सव्वा वर्ष कोरोनामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन आहे. या काळात अनेक महिने दारूविक्रीवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे दारूविक्री कमी होऊन एक्साईजच्या महसुलातही घट होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात या निर्बंधातही पोलीस व दंडाधिकारीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून दारू विक्री केली गेली.
अनेक बीअरबार, वाईनशाॅप, देशी दारू दुकाने, बीअर शाॅपी निर्बंधातही मागच्या दाराने चालविल्या गेल्या. तेथील दारूसाठा मोठ्या प्रमाणात व जादा दराने विकला गेला. त्यामुळेच गेल्या वर्षभरात एक्साईजला मिळणारा महसूल घटण्याऐवजी चक्क सव्वादोन कोटी रुपयांनी वाढला आहे. या वाढलेल्या महसुलातच दारूच्या अवैध मार्गाने विक्रीचे पुरावे दडले आहेत. 
वर्षभरात विकली गेलेली दारू ही वैधच होती. परंतु ती विकण्याची पद्धत मात्र अवैधरीत्या राबविली गेली. काही भागात दारूविक्रीत घट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षभर जिल्ह्यात सर्वत्रच दारूची अवैधरीत्या विक्री केली गेली. कारवाई मात्र नाममात्र झाली. तत्कालीन प्रशासनाने कारवाई करतानाही दुजाभाव केला. कुणाला अधिक, तर कुणाला नाममात्र दंड ठोठावण्यात आला.

वर्षभरात महसूल दोन कोटी रुपयांनी वाढला
- दारू हा राज्य शासनाला सर्वाधिक महसूल देणारा स्रोत आहे. 
- राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत या शुल्काची वसुली केली जाते. गेल्या वर्षभरात हा महसूल दोन कोटी २५ लाख रुपयांनी वाढला.
- यवतमाळ एक्साईजला महसूल वसुलीचे नवीन उद्दिष्ट १९ कोटींनी वाढवून ७६ कोटी करण्यात आले.

बीअर विक्रीत २४ टक्क्यांनी झाली घट

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात बीअरच्या विक्रीमध्ये २४ टक्क्यांनी घट झाली आहे. वर्षभरात १९ लाख ३८ हजार ८२२ लिटर बीअरची विक्री केली गेली.
वर्षभरात एक कोटी ४८ लाख आठ हजार ५८६ लिटर देशी दारूची विक्री केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती साडेसात लाख लिटरने घटली आहे.
विदेशी दारूच्या विक्रीतसुद्धा वर्षभरात पाच टक्क्याने अर्थात पावणेदोन लाख लिटरने घट झाली आहे. विक्री कमी झाल्याने त्यात महसूल कमी मिळाला.

 

अवैध दारूचे १०५३ गुन्हे
- गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्री करून परवानाप्राप्त दारूला आव्हान देणाऱ्यांविरुद्ध तब्बल १०५३ गुन्हे नोंदविले आहेत.
- गुन्हे दाखल झालेल्या १०५३ व्यक्तींकडून तब्बल एक कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात गावखेड्यातील दारूचाही समावेश आहे.

दारू कारखान्यामुळे महसुलात ४५ कोटींची वाढ
देशी, विदेशी दारू व बीअरमधून मिळणारा यवतमाळ जिल्ह्याचा महसूल अधिकाधिक सात ते आठ कोटी राहिला असता. परंतु मंगरूळ येथील दारू कारखान्यामुळे हा महसूल ४५ कोटींनी वाढला आहे. गेल्या वर्षभरात ५७ कोटी २५ लाखांचा महसूल वसूल केला गेला.
- सुरेंद्र मनपिया, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यवतमाळ

 

Web Title: Widespread liquor sales through closed doors from closed shops in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.