यवतमाळ जिल्ह्यात संशयावरून पत्नीचा निर्घृण खून, पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 08:51 PM2020-05-15T20:51:00+5:302020-05-15T20:52:05+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा चाकूचे सपासप वार करून निर्घृण खून केला व नंतर स्वत:ही झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना जिल्ह्याच्या पांढरकवडा पोलीस ठाण्यांतर्गत बोथबहात्तर गावात शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा चाकूचे सपासप वार करून निर्घृण खून केला व नंतर स्वत:ही झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना जिल्ह्याच्या पांढरकवडा पोलीस ठाण्यांतर्गत बोथबहात्तर गावात शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
सुरेखा मेश्राम (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती गुरुदास नारायण मेश्राम (३५) याने आत्महत्या केली. केळापूर ते पारवा मार्गावरील बोथबहात्तर या गावातील शिवारात ही घटना घडली. गुरुदास व त्याची पत्नी सुरेखा हे शुक्रवारी सकाळी शेतात गेले होते. कचरा वेचत असताना त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यातच गुरुदासने सुरेखाच्या शरीरावर चाकूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर बाजूलाच असलेल्या कडूनिंबाच्या झाडाला गळफास लावून गुरुदासने आत्महत्या केली. याच मार्गावर शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. या शाळेतील कुणाला तरी ही घटना दृष्टीस पडली. त्यांनी गावात घटनेची माहिती दिली. त्यानंतर पांढरकवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वृत्तलिहिस्तोवर मृतदेह शेतातच पडून होते. त्याचा पंचनामा केला जात होता.
दोन्ही मुले झाली अनाथ
मृतक मेश्राम दाम्पत्याला वर्ग सातवा व अकरावीतील दोन मुले आहेत. गुरुदासकडे चार एकर शेती आहे. तो संशयी वृत्तीचा होता, याच कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमी खटके उडायचे. आई-वडील दोन्ही गेल्याने ही दोन्ही मुले आता अनाथ झाली आहे.
शेतात जातानाच चाकू सोबत नेला
शुक्रवारी शेतात जाताना त्याने चाकू सोबत नेला. यावरून सुरेखाचा खून त्याने पूर्वनियोजित पद्धतीने केला असावा असा अंदाज सहायक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे यांनी वर्तविला आहे. या घटनेने बोरबहात्तर परिसरात खळबळ निर्माण झाली.