कौटुंबिक वादातून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून
By विशाल सोनटक्के | Published: June 8, 2024 06:18 PM2024-06-08T18:18:03+5:302024-06-08T18:18:38+5:30
हॉटेलमध्ये आढळले प्रेत : वाशिम मार्गावरील ढाब्यावरून पतीला मध्यरात्री अटक
यवतमाळ : पुसद शहरातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील एका हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपी पतीला वाशिम मार्गावरील एका ढाब्यावरून जेरबंद केले आहे. कौटुंबिक वादातून ओढणीने गळा आवळून पत्नी सपनाचा खून केल्याची कबुली आरोपी पतीने दिल्याची माहिती ठाणेदार उमेश बेसरकर यांनी ‘लोकमत’ला दिली. यातील मृतक महिलेचे नाव सपना संजय मोरे (२३) तर आरोपीचे नाव संजय प्रदीप मोरे (२५, रा. निंबी, ता. पुसद) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यातील बोरगडी येथील सपना लक्ष्मण पाईकराव हिचा संजय यांच्यात प्रेमाचे संबंध होते. दोघांचीही लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला व ११ मे २०२२ रोजी एका विहारामध्ये ते विवाहबंधनात अडकले. परंतु लग्नानंतर दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. त्यातूनच या दोघांनी घटस्फोट घेण्याचेही ठरविले होते. याबाबतची कार्यवाही सुरू असतानाच सपना व संजय हे शुक्रवार, ७ जूनरोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास शहरातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खोलीच्या दरवाजा उघडला नसल्याने व आवाज देऊनही खोलीतून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेलचे मालक देवेंद्र खडसे यांनी याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्याला दिली.
पोलिस पथकाने घटनास्थळ गाठून त्या रूमचे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बेडवर सपनाचा मृतदेह आढळून आला. मात्र, सपनाबरोबर असलेला तिचा पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेलमधून पसार झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी मृतक सपनाचे वडील लक्ष्मण पाईकराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी आरोपी संजय प्रदीप मोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा अधिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धीरज बांडे, पोलिस काॅन्स्टेबल नीलेश उंचेकर, दिनेश सोळंके, मनोज कदम आदी करीत आहेत.
कसून चौकशीनंतर आरोपीने दिली खुनाची कबूली
सपनाचा गळा आवळून खून केल्यानंतर पती संजय मोरे हा रात्रीच हॉटेलमधून पसार झाला होता. पंचनाम्यानंतर शहर पोलिसांनी मृतदेह पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर तत्काळ आरोपीच्या शोधमोहिमेस सुरुवात केली. रात्री १ वाजताच्या सुमारास आरोपी संजय मोरे हा वाशिम मार्गावरील एका ढाब्यावर असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला तत्काळ जेरबंद केले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने कौटुंबिक वादातून पती सपनाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.