दिग्रसच्या धावंडाला जलपर्णीचा विळखा
By admin | Published: June 2, 2014 01:51 AM2014-06-02T01:51:17+5:302014-06-02T01:51:17+5:30
शहराच्या मध्यभागातून वाहणार्या आणि महापुरात १९ जणांचा बळी घेणार्या धावंडा
दिग्रस : शहराच्या मध्यभागातून वाहणार्या आणि महापुरात १९ जणांचा बळी घेणार्या धावंडा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. नदीपात्र हिरवेगार झाले असून पावसाळा तोंडावर आला तरी स्वच्छतेबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. परिणामी यावर्षीच्या पावसाळ्यातही नदी तीरावरील घरांना पुराचा धोका संभवतो. दिग्रस शहरातून धावंडा नदी वाहते. शहराच्या मध्यभागातून वाहणारी ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रात जलपर्णी आणि बेशरम वाढली आहे. जलपर्णीच्या विळख्याने नदीचे पात्र हिरवेगार झाले आहे. धावंडा नदीच्या पात्रात शहरातील गटाराचे पाणीही येते. त्यामुळे नदीत पूर्ण घाण पाणी साचले आहे. उन्हाळ्यात साचलेल्या डबक्यातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. तसेच नदी तीरावर आणि पात्रातही मोठय़ा प्रमाणात बेशरमचे झुडूपे वाढली आहे. प्रशासनाने अद्यापपर्यंत नदी स्वच्छतेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. पावसाळ्यात थोडाजर पाऊस झाला तरी धावंडा नदीला पूर येतो. बेशरम आणि जलपर्णीमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. परिणामी नदी तीरावरील घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. नांदगव्हाण धरण फुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. या महापुरात १९ जणांचे बळी गेले. अर्धे शहर जलमय झाले होते. त्यानंतर पुनर्वसनासह विविध कामे सूचविण्यात आली. मात्र पुनर्वसनाचेही घोडे अडले आहे. आता पावसाळा तोंडावरच आला आहे. मात्र अद्यापही नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. पावसाळा आला की नदी तीरावरील नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. अन्यथा अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)