जंगलातील पाणवठे कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:38 PM2018-04-09T22:38:50+5:302018-04-09T22:38:50+5:30
नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पांडुरंग भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
या राखीव जंगलामध्ये बिबटाचाही संचार असल्याची नोंद आहे. आता पाणी नसल्याने बिबट गावशिवारातील पाणवठ्यांवर येत आहे. हरीण, रोही, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे हे प्राणीसुद्धा पाणवठ्यावर येत आहे. तृणभक्षी प्राण्यांची दबा धरून शिकार केली जात आहे. वन विभागाने लाखो रुपये खर्चून जंगलात पाणवठे तयार केले. या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात होते. मात्र मागील काही दिवसांपासून वन विभागाचा हा उपक्रम ठप्प आहे. वन्यप्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी नाही. तहानेने व्याकूळ झालेले प्राणी गलितगात्र अवस्थेत गावशिवारात भरकटताना दिसत आहे. येथे कुत्र्यांकडून हरीण, रानडुक्कर, रोही याची शिकार होत आहे. सोनखास परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई असून या बाबीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
जंगलातील पाणवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद केली जाते. वार्षिक बजेट असल्यानंतरही स्थानिक वन अधिकारी व सहायक उपवनसंरक्षकाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष आहे. याच तालुक्यातील लोनाडी बीटमध्ये बिबटाने हल्ला करून वगाराची शिकारही केली होती. सातत्याने बिबटाकडून गावशिवारात शिकारी होत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठीही प्रयत्न केले जात नाही. हा बिबट ट्रॅप कॅमेऱ्यातही चित्रीत झाला आहे. आता तर तापमानात वाढ झाली असून पाणवठा शोधण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर झाले आहे. रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, बिबट यासारख्या हिंस्त्र श्वापदापासून शेत शिवारात काम करणाºया मजुरांमध्येही दहशत निर्माण झाली आहे तर काहींनी जंगलातील पाणीटंचाईचा उपयोग शिकारीसाठी केला आहे. गावालगतच्या पाणवठ्यावर शिकारी दबा धरून बसतात. सावज टप्प्यात येताच त्याची शिकार केल्या जाते. रोही, हरीण याच्या मोठ्या प्रमाणात शिकारी होत असून मांसाची विक्री सुरू आहे. एकीकडे वनसंवर्धनासाठी शासकीयस्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिक अधिकारी व यंत्रणा मात्र अर्थकारणाच व्यस्त असल्याने मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.
वन विभागाचा टँकर जंगलात येत नाही
जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरची तरतूद केली आहे. यावर आर्थिक खर्च झाल्याचे नियमित दाखविले जाते. प्रत्यक्षात जंगलातील पाणवठ्यांची स्थिती भयावह आहे. वन्यप्राणी याच वेळखाऊ धोरणामुळे धोक्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचे काम नियमित होत नाही. याचा फटका परिसरातील नागरिकांसह वन्यप्राण्यांना बसत आहे. वरिष्ठांनी राखीव जंगलातील पाणवठ्यांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करण्याची गरज आहे.