उपविभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By admin | Published: August 11, 2016 01:08 AM2016-08-11T01:08:01+5:302016-08-11T01:08:01+5:30

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Wildlife in the subdivision | उपविभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

उपविभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

Next

हिरव्याकंच पिकांची नासाडी : उत्पन्नात घट होण्याची शक्यता
वणी : वणी, मारेगाव व झरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हे वन्यप्राणी हिरव्याकंच पिकांची नासाडी करीत आहे. परिणामी यावर्षी उत्पन्नात घट होण्याची असून शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या वर्षी वणी तालुक्यात तब्बल ४४ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची वन्यप्राण्यांनी नासाडी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. याबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर वनविभागाने संबंधित शेतात जाऊन पंचनामा केला व सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले होते. या ४४ शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतर मदत देण्यात आली. यावर्षी जवळपास सहा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी केली असून तीन शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित तीन शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
वणी, झरी व मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. त्यामुळे या जंगलात रोहि, रानडुकर, निलगायी व इतर वन्यप्राण्यांचा वावर असतो. हे वन्यप्राणी जंगलालगत असलेल्या शेतात जावून पिकांची नासाडी करीत आहे. शेतात सध्या कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन व इतर पिके घेण्यात आली आहेत. अगोदरच एक महिना पाऊस उशिरा आल्याने पिकांची उगवण संथगतीने झाली. शेतकऱ्यांनी कशीबशी पिके जगविली. मात्र आता वन्यप्राण्यांच्या नव्या संकटाशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी त्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे.
तालुक्यातील शेतात सध्या हिरवीकंच पिके डोलायला लागली आहेत. परंतु रोहि, रानडुकरांचे कळप शेतात घुसून कोवळ्या पिकांची नासाडी करीत आहे. रात्रीच्यावेळी शेतात सहसा कुणी जात नसल्याने हे वन्यप्राणी रात्रभरातून पिके उद्ध्वस्त करीत आहेत.
याबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी अनेकदा वनविभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. मात्र या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वनाधिकारी या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण करतात. मात्र प्रत्यक्षात या वन्यप्राण्यांचा बंदोबस्तच होत नाही.
त्याचबरोबर यावर्षी अनेक शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रानडुकरांची धास्ती पसरली आहे. उपविभागातील जंगलात चराईसाठी असलेल्या ई-वर्ग जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस वनसंपदा नष्ट होऊन जंगल विरळ होत चालले आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी आता गावाजवळ असलेल्या शेताकडे धाव घेऊन पिकांची नासधूस करीत आहे.
वन्यप्राणी शेतात किंवा गावात घुसले आणि त्यांनी हैदोस घातला व एखाद्या शेतकऱ्याने त्याचा बंदोबस्त केला, तर उलट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. परंतु वन्यप्राणी शेतात घुसून हिरव्याकंच पिकांची नासाडी करतात, ही एक शोकांतिका आहे.
काही वन्यप्राणी तर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांची नासाडी करतात. या वन्यप्राण्यांना शेतकऱ्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास, वन्यप्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याची भितीसुद्धा असते. त्यामुळे शेतातून वन्यप्राण्यांना कसे बाहेर काढावे, असाही प्रश्न त्यांना पडतो. एकंदरीत वन्यप्राण्यांच्या धुमाकूळाने शेतकरी त्रस्त झाला असून वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Wildlife in the subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.