अभयारण्यात वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:50 PM2018-04-04T21:50:45+5:302018-04-04T21:50:45+5:30
टिपेश्वर अभयारण्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी लागतात की लावल्या जातात, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यात आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत असून या आगी लागतात की लावल्या जातात, याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या आठवड्यातसुद्धा टिपेश्वर अभयारण्यातील गणेरी बिटमध्ये आग लागली होती. आगीची माहिती बाहेर येऊ नये, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. २५ मार्च रोजी गणेरी बिट परिसरात आग लागून गणेरी बिट व भिमकुंडमधील मौल्यवान वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. जवळपास ९०० ते हजार हेक्टरमधील वनसंपदा जळाल्याची माहिती आहे. ही आग कशामुळे लागली, याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. या अभयारण्याला नेहमीच लहान-मोठ्या आगी लागत असून लाखो रूपयांची मौल्यवान वनसंपदा व प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. अभयारण्यात आगीच्या घटना घडत असल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच वर्षांपूर्वी २०१३ मध्ये पिटापुंगरी परिसरात आग लागल्याने तीन निष्पाप मजुरांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तेव्हापासून सतत आगीची लहान-मोठी घटना घडत आहे. पिटापुंगरी परिसरात लागलेल्या आगीची अद्यापही चौकशी झाली नाही. ही आग कशामुळे लागली, याचा तपास पेंच प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून अद्यापही होऊ शकला नाही. त्यानंतर तीन वर्षानंतर टिपेश्वर अभयारण्याला पुन्हा मोठी आग लागली. यावेळी जवळपास १३०० ते १४०० हेक्टरमधील मौल्यवान वनसंपदा व अनेक प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. याप्रकरणात वनपरीक्षेत्राधिकारी लांबाडे यांना या निलंबित करण्यात आले होते. २५ मार्च रोजी लागलेल्या आगीतसुद्धा वनसंपदेचे नुकसान झाले आहे.