पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:03 PM2018-04-01T22:03:33+5:302018-04-01T22:03:33+5:30
वणी उपविभागातील जंगलामध्ये असलेले पाणवठे आटल्याने वन्यजीवांची आता पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असून शिकारीची शक्यताही बळावली आहे, तर काही पाणवठ्यांमधील पाणी दूषित झाले असून ते कित्येक महिन्यांपासून बदलविण्यातच येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी उपविभागातील जंगलामध्ये असलेले पाणवठे आटल्याने वन्यजीवांची आता पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असून शिकारीची शक्यताही बळावली आहे, तर काही पाणवठ्यांमधील पाणी दूषित झाले असून ते कित्येक महिन्यांपासून बदलविण्यातच येत नाही. मात्र या पाणवठ्याच्या देखभालीकडे वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून शासनातर्फे लाखो रूपये खर्चून जंगलामध्ये ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र या पाणवठ्यांत पाणी सोडण्यात येत नसल्यामुळे ते कोरडे ठक्क पडले आहे. परिणामी वन्यप्राण्यांना जंगलात पाणी मिळणे दुरापास्त झाले असून हे प्राणी आता पाण्याच्या शोधात गावकुसाकडे धाव घेताना दिसून येत आहे. उपविभागातील जंगलामध्ये रोही, रानडुक्कर, ससा, हरीण, वाघ, अस्वल, सांबर, मोर, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.
हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात आता गावाकडे असलेल्या नदी-नाल्यांकडे येत असून याचाच फायदा घेत काही शिकारी या वन्यप्राण्यांची शिकार करीत आहे. जंगलाशेजारी असलेल्या शेतांजवळ किंवा पाणवठ्यांपासून काही अंतरावर हे शिकारी वन्यप्राणी अडकविण्यासाठी जाळे टाकून ठेवतात. यात वन्यप्राणी अडकल्यावर त्यांची शिकार केली जाते. त्यानंतर हे मांस गावाशेजारी आणून त्याची छुप्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. असे प्रकार अनेक नागरिकांना दिसून येतात. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही शिकार का दिसत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन्यप्राण्यांची शिकार रोखण्याकरिता वनविभागाने पाणवठ्यात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. काही पाणवठ्याची तर अतिशय दुरवस्था झाली असून या पाणवठ्यात पाणीसुद्धा टिकत नाही. उलट ते पाणी वाया जात असून त्यांच्या दुरूस्तीचीही गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने या प्रकाराकडे लक्ष देऊन जंगलातील पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.