हिंस्त्र वन्यजीव गावकुसात

By admin | Published: April 17, 2017 12:23 AM2017-04-17T00:23:21+5:302017-04-17T00:23:21+5:30

तळपत्या उन्हाने जंगलातील जलस्रोत आटले असून कासावीस झालेले हिंस्त्र वन्यजीव गावकुसाकडे धाव घेत आहे.

Wildlife Wildlife | हिंस्त्र वन्यजीव गावकुसात

हिंस्त्र वन्यजीव गावकुसात

Next

जलस्रोत आटले : वाढत्या हल्ल्यांनी शेतकरी धास्तावले, महागावात तीन जखमी
पुसद : तळपत्या उन्हाने जंगलातील जलस्रोत आटले असून कासावीस झालेले हिंस्त्र वन्यजीव गावकुसाकडे धाव घेत आहे. यातून मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढला असून पुसद आणि उमरखेड उपविभागात रानडुकरांच्या हल्ल्यांच्या घटनात वाढ झाली आहे. महागाव तालुक्यात तर एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला करून शेतमजुरांना गंभीर जखमी केले.
उमरखेड आणि पुसद उपविभागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात तृणभक्षी आणि हिंस्र प्राणी आहेत. जंगलातून वाहणारी पैनगंगा आटल्याने वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी वन्यजीव विभागाने ठिकठिकाणी पानवठे उभारले आहे. परंतु या पानवठ्यांची देखभाल योग्यरीत्या होत नाही. पानवठ्यात वेळीच पाणी भरले जात नाही. त्यामुळे कासावीस झालेले वन्यजीव पाण्याच्या शोधात शेतशिवारात आणि गावकुसात शिरत आहेत. महागाव तालुक्यात गत आठवड्यात दोन शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केला. शेतात ज्वारीच्या रखवालीसाठी गेलेले माळकिन्ही येथील गजानन रामजी शिरडकर आणि जनावरे चारण्यासाठी जंगलात गेलेले लक्ष्मण रामजी इंगळे रा. साई यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात दोनही गंभीर जखमी झाले. या दोन घटना शेतात अथवा जंगलात तरी झाल्या. काळीदौलत येथील एका चिमुकलीवर रानडुकराने अंगणात येऊन हल्ला केला. शर्वरी शरद सरोदे (५) ही बालिका रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तसेच या गावातील एक महिलाही याच रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाली.
पुसद उपविभागातील दिग्रस आणि पुसद तालुक्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ झाले आहे. माळपठार भागातील जंगलात वन्यजीव रस्त्यावर येत आहेत. रानडुक्कर सर्वाधिक आक्रमक झाले असून ओलिताच्या शेतात हमखास रानडुकरांचा संचार असतो. झुंडीने राहणारे रानडुक्कर हल्ला केल्यानंतर आपल्या सुळ्याने समोरच्याला अक्षरश: फाडून टाकतात. पुसद आणि दिग्रसमध्ये अशा घटना गत काही दिवसात पुढे आल्या आहेत.
हिंस्त्र प्राणी गावकुसात आणि शेतशिवारात शिरत असल्याने शेतकरी आणि शेतमजुरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. जंगलात एकटे दुकटे जाण्याची कुणीचीही हिंमत होत नाही. विशेष म्हणजे वन्यजीवाने हल्ला केल्यानंतर जखमीला वन विभागातर्फे नुकसानभरपाई दिली जाते. परंतु ही वेळच येऊ नये यासाठी वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. सध्या पारा ४३ अंशाच्या पार गेला असून जलस्त्रोत झपाट्याने खाली जात आहे. यामुळे वनविभागाने ठिकठिकाणी पानवठे निर्माण करण्याची मागणी वन्यप्रेमी करीत आहे. (कार्यालय चमू)

शिकारीच्या घटनांत वाढ

पाण्यासाठी कासावीस झालेले तृणभक्षी प्राणी गावकुसात शिरतात. व्याकुळ प्राणी अलगद शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतात. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात शिकाऱ्यांचा मुक्त संचार असल्याचे दिसून येते. काही दिवसापूर्वी दोन शिकाऱ्यांना एअरगणसह ताब्यात घेण्यात आले होते. आता तर मोर, हरीण, तितर, बटेर आदी पशुपक्षी पाण्याच्या शोधात असल्याने शिकाऱ्यांचे सहज सावज होत आहे. ग्रामीण भागापेक्षा वन्य प्राण्यांच्या शिकारीत शहरी मंडळीच गुंतली असून ग्रामीणांच्या मदतीने शिकारीचा हिस्सा शहरातील हॉटेल आणि ढाब्यांपर्यंत पोहोचतो. शिकाऱ्यांवर कोणतेही कारवाई केली जात नाही.

Web Title: Wildlife Wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.