केन्द्र सरकारविरुध्द यवतमाळातून बिगुल फुंकणार; 20 फेब्रुवारीला राकेश टिकैत यांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:24 PM2021-02-11T12:24:26+5:302021-02-11T12:31:42+5:30
केन्द्र सरकारविरुध्द बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक आझाद मैदानात ही सभा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केन्द्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधीत पारीत केलेल्या कायद्याविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारी धार्जिणे असून त्यामुळे शेतक-यांची प्रचंड लुट होणार आहे. दरम्यान हे तुघलकी कृषी कायदे परत घेण्यासाठी तसेच केन्द्र सरकारविरुध्द बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक आझाद मैदानात ही सभा होणार आहे.
या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमतीचे संरक्षण संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. या नविन कायद्यांच्या माध्यमातून शेतीचे व्यापारीकरण करण्यात आले आहे. करार शेतीमुळे गरीब, हतबल शेतकरी आनखी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. केन्द्र सरकारचे कायदे येण्यापुर्वीच मोठमोठे वेअर हाऊस बांधणे सुरु झाले आहे. शेतक-यांसोबत शेतीचा करार करायचा, चांगले उत्पन्न घ्यायचे आणि शेतक-यांची मात्र कमी भावात बोळवण करायची असा गोरखधंदा सुरु होणार आहे. व्यापारी हे व्यापार करण्यात हुशार असतात त्यामुळे त्यांचेकडून शेतक-यांबद्दल आत्मीयतेची भावना जागृत होण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. या व्यापारीकरणात शेतक-यांचा शेतीव्यवसाय संपुष्टात येईल.
हक्काचे व्यासपीठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुध्दा संपुष्टात येतील. त्यामुळे व्यापा-यांची एकाधिकारशाही सुरु होईल अशी भिती सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान केन्द्र सरकारने हे काळे कायदे परत घ्यावे यासाठी दिल्ली येथे गेल्या दोन महिण्यापासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आता हे आंदोलन देशभरात सुरु करण्यासाठी रणनिती आखण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने यवतमाळ येथे आझाद मैदानात दिनांक 20 फेब्रुवारीला शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी बुधवारी जिल्हयातील शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली.
यवतमाळातून आंदोलनाला सुरुवात
केन्द्र सरकारने पारीत केलेल्या काळया कृषी कायद्याविरोधात दिल्ली सिमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आता हेच आंदोलन देशभर पेटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात यवतमाळातून होत आहे. यवतमाळात सभा व्हावी यासाठी राकेश टिकैत यांनी होकार दिला असून जिल्हाभरातील शेतकरी तसेच नागरीकांनी या सभेला उपस्थित राहणे गरजेचे आहे.
सिकंदर शहा
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना