बंजारा समाजाचे प्रश्न सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:33 PM2019-07-17T21:33:05+5:302019-07-17T21:33:21+5:30
बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) येथे नंगारा वस्तुसंग्रहालय भूमिपूजनानिमित्त झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमातूनच गोर बंजारा समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे महत्वाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) येथे नंगारा वस्तुसंग्रहालय भूमिपूजनानिमित्त झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमातूनच गोर बंजारा समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे महत्वाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बैठकीत ना. संजय राठोड यांनी शिष्टमंडळाच्यावतीने बंजारा समाजाची भूमिका मांडली. गोर बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश, नॉन क्रिमिलियर अटीतून वगळून पदोन्नतीमध्ये आरक्षण, बंजारा समाज राहत असलेले तांडे व कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावावर करणे, बंजारा लोककलांचा सांस्कृतिक धोरणात समावेश, बंजारा क्लस्टर विकास, पोहरागड येथे कौशल्य विकास कार्यक्रमाधारित औद्योगिक विकास संस्थेची निर्मिती आदी मागण्यांचे सादरीकरण शिष्टमंडळाने केले.
यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. शिष्टमंडळात आमदार हरिभाऊ राठोड, डॉ. तुषार राठोड, अॅड. नीलय नाईक, आंध्रप्रदेशचे माजी मंत्री अमरसिंग तिलावत, जगन्नाथराव (हैदराबाद), आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राजू नाईक, गोविंद राठोड, एस.टी. नाईक, मिलिंद पवार, मंगल चव्हाण, मोहन चव्हाण, डॉ. टी.सी. राठोड, योगेश चव्हाण, सचिन जाधव, डॉ. महेश चव्हाण, सुभाष जाधव, ज्योतीराम चव्हाण, बळीराम चव्हाण, राजाराम जाधव, किरण वडते, रवींद्र पवार, नीलेश राठोड, बापूराव राठोड आदींचा समावेश होता. गेल्याच आठवड्यात शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.