दिवाळीला तरी साखर मिळणार का? तूर्त कुठल्याच जिल्ह्याला साखरेचा कोटा उपलब्ध झाला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 06:02 PM2024-10-15T18:02:08+5:302024-10-15T18:03:17+5:30
Yavatmal : उत्सवाच्या काळात साखरेचा पुरवठा केव्हा होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा आणि नियमित धान्याचे वितरण केले जाते. यामध्ये सण, उत्सवाच्या काळात साखरेचा समावेश असतो. गतवर्षी दिवाळीच्या पर्वावर आनंदाचा शिधा वितरित झाला. यावर्षी मात्र तूर्त राज्यातील कुठल्याच जिल्ह्याला साखरेचा कोटा उपलब्ध झाला नाही. यामुळे नोव्हेंबर महिन्यात स्वस्त धान्य दुकानात साखर असणार किंवा नाही हे सांगणे तूर्त अवघड आहे. दिवाळीला दुकानातून साखर न मिळाल्यास उत्सव गोड कसा होणार, असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांपुढे उभा आहे.
राज्यात कुठेच साखरेचे आवंटन उपलब्ध नाही
स्वस्त धान्य दुकानात साखर वितरित करण्यापूर्वी राज्याला कुठून किती साखरेचा कोटा मिळणार याची माहिती प्रथम पुरविली जाते. त्यानुसार वितरणाचे नियोजन केले जाते. यावेळी राज्यातील सर्वच जिल्ह्यात साखरेचा कोटा आलेला नाही. यामुळे तूर्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहा तालुक्यांना मिळणार मोफत ज्वारी
ज्या तालुक्यात हमी केंद्रावर ज्वारीची खरेदी करण्यात आली. त्या ठिकाणी उपलब्ध ज्वारीच्या स्थितीनुसार अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबाला मोफत ज्वारी दिली जाणार आहे. गव्हाच्या जागेवर ही ज्वारी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गहू, तांदूळ आणि ज्वारी
पुसद, झरीजामणी, महागाव, केळापूर, राळेगाव आणि कळंब तालुक्यात गव्हाच्या जागेवर ग्राहकांना ज्वारी दिली जात आहे. यासोबतच तांदूळ दिले जात आहेत.
कोटा उपलब्ध होताच साखरेचा पुरवठा होणार
"तूर्त साखरेचा कोटा उपलब्ध झालेला नाही. हा कोटा उपलब्ध होताच साखरेचा पुरवठा होणार आहे. सहा तालुक्याला मोफत ज्वारी दिली जात आहे."
- सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ