वणीचा इंग्रजकालीन शिंगाडा तलाव टाकतोयं कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:04 PM2019-04-27T21:04:09+5:302019-04-27T21:04:52+5:30
शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिंगाडा तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना ‘लोकमत’ने ही बाब वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढे आणली. त्याची दखल घेत आता या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. लवकरच हा तलाव कात टाकणार आहे.
म.आसिफ शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिंगाडा तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना ‘लोकमत’ने ही बाब वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढे आणली. त्याची दखल घेत आता या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. लवकरच हा तलाव कात टाकणार आहे.
ब्रिटिशकाळात वणी हा जिल्हा होता. परिसरातील जलस्त्रोत जीवंत ठेवण्यासाठी त्या काळात इंग्रजांनी तीन तलावांची निर्मिती केली. मात्र यापैकी दोन तलाव अतिक्रमणाने गिळंकृत केले. त्यामुळे सध्या केवळ शिंगाडा तलावाचे अस्तित्व कायम आहे. इंग्रजांनी त्यावेळी तलावाच्या सजावटीसाठी तलावात तीन मोठे बुरूजही उभे केले होते. परंतु कालांतराने वणी जिल्ह्याला घरघर लागली आणि यवतमाळ हा जिल्हा बनला. वणीत पालिकेची स्थापना झाली तेव्हापासून आजतागायत या तलावाकडे दुर्लक्षच झाले. परिणामी या तलावाची अवस्था बिकट झाली. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. परिणामी जलवाहिन्या बंद झाल्या. लगतच्या विहिरी, बोअरदेखील आटल्या. या तलावातसुद्धा ३० टक्के अतिक्रमण झाले आहे. तलावाची अवस्था बिकट झाल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. मच्छिमार सहकारी संस्थेने या तलावाच्या खोलिकरणासाठी निवेदन दिले होते. ‘लोकमत’ने या विषयात वृत्तमालिका प्रकाशित केली. त्याची दखल घेण्यात आली. तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सिंचन विभागामार्फत करण्यात येणार असून त्याचे कंत्राट खामगाव येथील एका कंपनीला देण्यात आले आहे.
संबंधित कंपनीला तलाव सौंदर्यीकरणाचा चांगला अनुभव असून तो तलावासाठी फायदेशीर ठरणार आहे. सौंदर्यीकरणासाठी तलावातील संपूर्ण पाणी सोडण्यात आले. गंभीर बाब ही की, शहरात गटाराचे पाणी तलावात येत असल्यामुळे तलाव सुकण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे ज्या नाल्यांमधून तलावात पाणी येते, त्या नाल्या बंद कराव्या, असे पत्र मच्छिमार सहकारी संस्थेने नगरपालिकेला दिले आहे. मात्र आचारसंहितेमुळे यासंदर्भातील निविदा काढण्यास अडचण येत आहे. तलावाच्या कंत्राटदाराने एका दिवसातच या तलावाचे सर्व्हेक्षण केले असून जेसीबीद्वारे तलावातील झाडे तोडली जात आहे. तसेच तलावात अस्तित्वात असलेले पाणी एकत्रित करण्यात येत आहे. १ मेपासून कामाचा वेग वाढणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस कंत्राटदाराने व्यक्त केला. हा तलाव पूर्वी संपूर्ण विदर्भात शिंगाडा तलाव म्हणून प्रसिद्ध होता. शिंगाडा खरेदी करण्यासाठी विदर्भातील मोठे व्यापारी येथे येत असत. यावरच स्थानिक भोई समाजबांधव आपली उपजिविका चालवायचे. सोबतच या तलावात मासेमारीदेखील केली जात असे. तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणासाठी यापूर्वी दोनवेळ भूमिपूजन करण्यात आले होते. तसे फलकही त्याठिकाणी लावण्यात आले होते. परंतु कालांतराने काम रखडले. तलावाची रचना अतिशय चांगली असून हा तलाव गावाच्या मधोमध आहे. या तलावात बोटींगची व्यवस्था केल्यास पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा निर्माण होणार आहे. सोबतच उत्पन्नातही भर पडणार आहे.