वणी, झरीला गारपिटीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:02 AM2019-03-23T00:02:32+5:302019-03-23T00:04:04+5:30
वणी तालुक्यासह झरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसाने चांगलेच तांडव घातले. यादरम्यान, जोरदार गारपीटही झाली. विशेष म्हणजे वणी परिसराला गत दोन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत आहे. यामुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकाला चांगलाच फटका बसला. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तालुक्यासह झरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसाने चांगलेच तांडव घातले. यादरम्यान, जोरदार गारपीटही झाली. विशेष म्हणजे वणी परिसराला गत दोन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत आहे. यामुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकाला चांगलाच फटका बसला. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.
गेल्या तीन दिवसांपासून वणी परिसरात दररोज सायंकाळी निसर्गाचे अक्षरश: तांडव सुरू आहे. बुधवार व गुरूवार असे सलग दोन दिवस वादळी पावसाने थैमान घातले. गुरूवारी सायंकाळी सहा वाजतानंतर अचानक आभाळ भरून आले. त्यानंतर वादळ सुरू होऊन मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात या परिसराला गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. यामुळे वणी तालुक्यातील ५५ हेक्टरवरील गहू, चणा व भाजीपाला पिक उद्ध्वस्त झाले. कृषी विभागातर्फे लवकरच या नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. गुरूवारी रात्री वादळी पावसामुळे वणी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरू झाला नव्हता.
झरी तालुक्यात मोठे नुकसान
झरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपीट झाली. यात शेतात ठेवून असलेले सोयाबीन व तुरीचे कुटार भिजून खराब झाले. या तालुक्यात वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळामुळे तालुक्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला असून त्याच्या दुरूस्तीचे काम अद्यापही सुरू आहे. वीज पुरवठा बंद असल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.
पाटणबोरीत झाड कोसळून बैलजोडी ठार
गुरूवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे पाटणबोरी येथील १५० वर्षे जुने चिंचेचे झाड कोसळून त्या झाडाखाली असलेली बैलजोडी जागीच ठार झाली, तर दोन बैल जखमी झाले. नागरिकांनी या जखमी बैलांना बाहेर काढले. तसेच मंगलसिंग बावरे यांच्या घरावर कडूनिंबाचे झाड कोसळल्याने घराची भिंत क्षतीग्रस्त झाली. सुदैवाने जिवीतहानी टळली. तसेच वासवी मंदिराचेही एका भागाचे छत वाकले. पाटणबोरी ते पाटण रस्त्यादरम्यान झाड उन्मळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच विजेचे खांब वाकल्याने वीज पुरवठाही खंडित झाला होता. पिंपरी येथील सुशिला पसलवार यांच्या शेतातील पाच एकरवरील मिर्चीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच रमेश तोटावार यांच्या शेतातील मका पिकाचे नुकसान झाले.