वणी उपविभागात हेल्पर बनले वायरमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:25 PM2019-02-05T22:25:22+5:302019-02-05T22:26:27+5:30
नियुक्ती करण्यामागील मुळ उद्देशाला हरताळ फासत वीज वितरण कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांची अक्षरश: मुस्कटदाबी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : नियुक्ती करण्यामागील मुळ उद्देशाला हरताळ फासत वीज वितरण कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांची अक्षरश: मुस्कटदाबी केली जात आहे. वीज वितरण कंपनीत कार्यरत लाईनमनला काम करताना केवळ मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या या कामगारांना अक्षरश: वीज जोडण्याच्या कामात गुंतविले जात आहे.
वणी तालुक्यात लालगुडा, चिखलगाव, वणी कृषी उत्पन्न बाजार समिती, मोहोर्ली, घोन्सा, कायर, मोहदा, शिंदोला याठिकाणी महावितरणचे ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्र आहेत. या विद्युत उपकेंद्राअंतर्गत काम करणाºया लाईनमनला मदत व्हावी म्हणून प्रत्येक उपकेंद्रात चार हेल्परची पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्यात आली आहे. महात्मा फुले वायरमन कोआॅपरेटीव्ह सोसायटी यवतमाळच्याअंतर्गत हे कामगार वीज वितरणची कामे करित आहे. एखाद्या ठिकाणी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तेथे दुरूस्तीचे काम वायरमन करतो. या वायरमनला या कामात मदत व्हावी म्हणून हेल्परची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामगारांना दरमहा आठ हजार रूपये मानधन दिले जाते. मात्र वणी तालुक्यात कार्यरत या कामगारांना थेट वीज जोडणीच्या कामाला जुंपले जात आहे. विशेष म्हणजे या कामाचा या कामगारांना फारसा अनुभव नाही. तरीही वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांना ही जिकरीची कामे करावी लागत आहे. मुळात वीज जोडणीचे अथवा तांत्रिक दुरूस्तीचे काम करण्याची जबाबदारी ही वीज वितरणच्या कंपनीत कार्यरत लाईनमनची असते. परंतु हे लाईनमन स्वत: ते काम न करताना या कामगारांकडून सदर काम करून घेत आहेत. त्यामुळे यातून एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राजूर येथील फिडरवर काम करणाऱ्या एका हेल्परचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही हे हेल्पर वरिष्ठांच्या सांगण्यावरून धोका पत्करत वीज जोडणी अथवा तांत्रिक बिघाड दुरूस्तीची कामे करताना दिसत आहेत.
लाईनमनने खांबावर चढून काम करणे अपेक्षित आहे. मात्र हेल्परलाच थेट खांबावर चढवून त्यांच्याकडून ही कामे करवून घेतली जात आहे. कसेबसे काम मिळाल्याने हे कामगार कोणतीही तक्रार न करता ही कामे करताना दिसत आहेत.
जिल्हास्तरावरून होतेय कामगारांचे आर्थिक शोषण
तालुक्यातील ३३ के.व्ही.उपकेंद्रात काही ठिकाणी चार, तर काही ठिकाणी दोन हेल्पर कार्यरत आहे. त्यांना दरमहा आठ हजार रूपये वेतन दिले जाते. मात्र त्या मानधनातील काही ‘वाटा’ जिल्हास्तरावर न चुकता दरमहा द्यावा लागतो. या वसुलीसाठी यवतमाळहून खास व्यक्ती येथे येत असल्याची माहिती आहे.