तळागाळातील कार्यकर्ता मातोश्रीसोबत; तालुकाप्रमुखही शिवसेनेशी एकनिष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 05:00 AM2022-07-04T05:00:00+5:302022-07-04T05:00:16+5:30
राजकारणातील शिंदे गटात संजय राठोड सामील झाले आहे. त्यामुळे शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद शिवसेनेत रंगला आहे. या स्थितीत जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक मात्र आजही सत्तेबाहेर पडलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. शिवसेनेच्या भरोशावर पद, प्रतिष्ठा मिळालेल्यांना ईडीचा धाक होता. संपत्ती राखण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. शिवसैनिक कुणालाच घाबरणारा नसून पक्षप्रमुखासोबत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात शिवसेनेने खासदार व एक आमदार दिला आहे. कॅबिनेट मंत्री असलेल्या संजय राठोड यांना भाजपने केलेल्या आरोपामुळे पायउतार व्हावे लागले. आता राजकारणातील शिंदे गटात संजय राठोड सामील झाले आहे. त्यामुळे शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद शिवसेनेत रंगला आहे. या स्थितीत जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक मात्र आजही सत्तेबाहेर पडलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. शिवसेनेच्या भरोशावर पद, प्रतिष्ठा मिळालेल्यांना ईडीचा धाक होता. संपत्ती राखण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. शिवसैनिक कुणालाच घाबरणारा नसून पक्षप्रमुखासोबत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत
जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा रस्त्यावर उतरून निषेध केला. उमरखेड, यवतमाळ, वणी यासह बहुतांश तालुक्यात आंदोलने झाली. शिवसेनेचे तिन्ही जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, पराग पिंगळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.
घाटंजी, दारव्हा शिंदे गटाकडे
महाविकास आघाडीत शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला हरताळ फासला गेला. याच बरोबर निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारी होत्या. याची पक्षश्रेष्ठीने दखल न घेतल्यामुळे सर्व प्रकार घडला आहे. आपण आमदार संजय राठोड यांच्यासोबत असल्याचे सांगत मनोज सिंगी यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला.
कोण कोणाच्या पाठिशी?
आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आम्ही ना भाऊचे आणि ताईचे आम्ही शिवसेनेचे मावळे आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात मूळ शिवसेनेसोबतच राहणार.
- नीलेश मेत्रे, कळंब
एकनाथ शिंदे व इतर आमदारांच्या बंडाशी आमचा कोणताही संबंध नाही. आम्ही सदैव ‘मातोश्री’सोबत आहोत. तालुक्यातील सर्वच पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतच राहणार आहेत. - दीपक काळे, पुसद
शिवसेनेमधील काही मंत्री आणि आमदार सोडून गेले. त्यांना ईडीची भीती वाटत आहे, तर काहींना मंत्रिपदाची लालसा आहे. हे खरे कारण आहे. सध्या उद्धव साहेबांची बदनामी त्यांनी सुरू केले आहे. - संजय रंगे, यवतमाळ
सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. माजी मंत्री संजय राठोड यांनी बंडखोरी केली असली तरी सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत.
- जयवंत बंडेवार, पांढरकवडा
कार्यकर्ता मातोश्रीसोबत
सच्चे शिवसैनिक मनातून दुखावले आहेत. ते बाळासाहेबांच्या नावावर निवडून आले. सत्तेच्या लालसेपोटी पक्षाशी गद्दारी केली. - रवी बोढेकर, वणी
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे कार्यकर्ते आहोत. दुसऱ्या गटाचा विचारही मनात येणे नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. - वसंत जाधव, बाभूळगाव