संजय राठोड नेमके कुणासोबत? सेनेत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 05:00 AM2022-06-23T05:00:00+5:302022-06-23T05:00:14+5:30
मंगळवारी बंडानंतर शिवसेना आमदार संजय राठोड यांचेही नाव एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये आले होते. प्रत्यक्षात मंगळवारी रात्री संजय राठोड हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते, असे त्यानंतर स्पष्ट झाले. मात्र बुधवारी सकाळी संजय राठोड हे गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याच्या वार्ता आल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक बुचकळ्यात पडला. त्यातच बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी जारी केलेल्या समर्थक आमदारांच्या यादीतही आमदार राठोड यांचे नाव नसल्याने राठोड नेमके कोणासोबत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मंगळवारी रात्रीपर्यंत आदित्य ठाकरे यांच्या साेबत असलेले आमदार संजय राठोड बुधवारी गुवाहाटीकडे रवाना झाल्याचे वृत्त आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर झालेल्या समर्थकांच्या यादीमध्येही संजय राठोड यांचे नाव नसल्याने राठोड नेमके कुणासोबत आहेत, असा प्रश्न शिवसैनिकांत निर्माण झाला आहे. दुसरीकडे राजकीय अस्थिरतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे मंगळवारी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या घडामोडी महाविकास आघाडीबरोबरच भाजपचेही भवितव्य ठरविणाऱ्या असल्याने मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ पातळीवरील हालचालींकडे लक्ष लागले आहे. मंगळवारी बंडानंतर शिवसेना आमदार संजय राठोड यांचेही नाव एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये आले होते. प्रत्यक्षात मंगळवारी रात्री संजय राठोड हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते, असे त्यानंतर स्पष्ट झाले. मात्र बुधवारी सकाळी संजय राठोड हे गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याच्या वार्ता आल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक बुचकळ्यात पडला. त्यातच बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी जारी केलेल्या समर्थक आमदारांच्या यादीतही आमदार राठोड यांचे नाव नसल्याने राठोड नेमके कोणासोबत आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, राठोड यांची भूमिका अस्पष्ट असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही राज्यातील घटना-घडामोडीबाबत चुप्पी साधली आहे. नुकत्याच झालेल्या सहा नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप बॅकफूटवर आली होती. या निवडणुकीत शिवसेनेसह काँग्रेसने लक्षवेधी कामगिरी करीत मुसंडी मारली होती. त्यामुळेच आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावलेली आहे. जिल्ह्यातील यवतमाळसह आठ नगर परिषदांची निवडणूक पूर्वप्रक्रिया पूर्ण झाली आहे. या नगर परिषदांची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून, आरक्षण सोडतीची प्रक्रियाही पार पडलेली आहे.
त्यामुळेच अनेक इच्छुकांनी नगर परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असून प्रभागामध्ये ते कामालाही लागले आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ६९ गट आणि पंचायत समितीच्या १३८ गणांसाठीच्या गट प्रारूपला ग्रीन सिग्नल मिळालेला असून, या निवडणुकीसाठीही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढलेली असतानाच शिवसेनेतील या बंडाळीमुळे इच्छुकांतही घालमेल सुरू झाली आहे. राज्याच्या सत्तेच्या नव्या समीकरणानंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय असेल याचे आखाडे बांधले जात आहेत. त्यामुळे तूर्त तरी राज्यातील घडामोडींवर कोणीही पदाधिकारी बोलण्यास इच्छुक दिसत नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिवसेनेतील घडामोडींवर लक्ष
- नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांची अनेक इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. त्यातच शिवसेना आमदारांनी हे बंडाचे निशाण फडकविल्याने शिवसेनेचे उद्या काय होणार असा प्रश्न शिवसैनिकांसह घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनाही पडला आहे. त्यामुळेच शिवसेनेमध्ये घडत असलेल्या घडामोडींवर या पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
भावना गवळी यांचा कल भाजपच्या बाजूने
- जिल्हा शिवसेनेत संजय राठोड आणि भावना गवळी यांचे उघड उघड दोन गट आहेत. ईडीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून खासदार भावना गवळी यांनी कुठलेही राजकीय वक्तव्य करण्याचे टाळले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर बुधवारी त्यांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बंडखोरांवर कारवाई करू नका, अशी विनंती केली. त्यामुळे खासदार गवळी यांचा कल एकप्रकारे भाजपच्या बाजूने असल्याची चर्चा आहे.