झिरो मशागत शेतीने उत्पन्नाच्या धनराशी; शेतीची पोत सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न

By रूपेश उत्तरवार | Published: October 25, 2022 02:10 PM2022-10-25T14:10:21+5:302022-10-25T14:12:51+5:30

वाहून जाणारी माती आता शेतातच, पोत सुधारला उत्पन्नही वाढले

With zero tillage farming, soil runoff is now in the field, improving texture and yield | झिरो मशागत शेतीने उत्पन्नाच्या धनराशी; शेतीची पोत सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न

झिरो मशागत शेतीने उत्पन्नाच्या धनराशी; शेतीची पोत सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न

Next

यवतमाळ : शेती करताना विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने मशागतीवर सर्वाधिक खर्च होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने त्यामध्ये आणखीच भर पडली आहे. शेतीची मशागत न करता बेड पद्धतीने झिरो मशागत शेती करताना उत्पन्नाच्या राशी शेतकऱ्यांच्या घरात आल्या आहेत. या यशस्वी प्रयोगाला एक तपानंतर वेगळी ओळख मिळाली आहे. शिक्षक शेतकऱ्याने केेलेला हा प्रयोग जिल्ह्यात पाय रोवत आहे.

यवतमाळातील नौशाद खान यांची वाई हातोला येथे शेती आहे. या शिक्षकाने आपल्या शेतशिवारात झिरो मशागत शेतीचा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे दहा ते बारा वर्षांपासून याच पद्धतीचा अवलंब करीत त्यांनी विक्रमी उत्पादन आपल्या शेतात घेतले आहे. उत्पन्नाची ही वेगळी तऱ्हा पाहून इतरही शेतकरी या प्रयोगाकडे वळत आहेत.

झिरो मशागत पद्धतीमध्ये दरवर्षी नांगरणी करण्याचे कामच नाही. यामध्ये एक वेळेस बेड तयार करून त्यावर पिकाची लागवड करता येते. निघालेल्या पिकाचा अवशेष दोन बेडमध्ये अंतरामध्ये कुजविला जातो. इतर वेळेस तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रित केले जाते. दरवर्षी मशागत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब निर्माण झाला आहे. याशिवाय गांडुळाचे प्रमाणही जमिनीत वाढले आहे. अधिक पाऊस आला तर सऱ्यांच्या माध्यमातून पाणी वाहून जाते. कमी पाऊस आला तर बेड पद्धतीमध्ये ओलावा टिकून राहतो. यामुळे पिकाचे उत्पन्न वाढण्यासोबतच जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मिळण्यात लाभ झाला आहे. याशिवाय शेतीमधील मशागतीचा खर्चही वाचला आहे. विशेष म्हणजे सुपीक मातीचा थर शेतातून वाहून जाण्याचे प्रमाण थांबले आहे.

एका एकरामध्ये अडीचशे क्विंटल हळद

या पद्धतीमध्ये शेतकऱ्याने एका एकरात अडीचशे क्विंटल ओली हळद घेतली. वाळून ती ५१ क्विंटल झाली. याशिवाय दोन एकरात ११० टन पपई, एका एकरात १६ क्विंटल, तूर यामध्ये मुख्य पीक तूरच होते. अंतरपीक नव्हते. एका एकरात १३ क्विंटल कापूस, ३५ टन टरबूज, १८ टन खरबूज असे उत्पन्न घेतले आहे.

इतर शेतकरी पीक पद्धतीकडे वळले

झिरो मशागत पद्धतीने बेडवर सोयाबीन असेल तर ते काढून हरभरा लावता येते. याच बेडवर टरबूजही लावता येते. यामुळे मशागतीचा खर्च होत नाही. या ठिकाणी पिकाचे अवशेष हळूहळू कुजतात. यामुळे पिकाच्या अवशेषापासून खत तयार होते. यातून जिल्ह्यात झिरो मशागत पद्धती वाढत चालली आहे.

या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला वाईसाठी लागणारा खर्च वाचविता येतो. यातून आर्थिक बचत होते. जमिनीची सुपिकता सुधारते. मी १२ वर्षांपासून हा प्रयोग करीत आहे. यात नुकसान नाही. अनेकांनी यानुसार अवलंब सुरू केला आहे.

- नौशाद खान, वाई हातोला

Web Title: With zero tillage farming, soil runoff is now in the field, improving texture and yield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.