मानव विकासच्या बसेस वाहकाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:36 PM2018-01-06T23:36:35+5:302018-01-06T23:36:48+5:30
वणी आगारातून झरी व मारेगाव तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी सोडण्यात येणाºया मानव विकास मिशनच्या अनेक बसेस वाहकाविनाच धावत असल्याने या बसमधून प्रवास करणाºया विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी आगारातून झरी व मारेगाव तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी सोडण्यात येणाºया मानव विकास मिशनच्या अनेक बसेस वाहकाविनाच धावत असल्याने या बसमधून प्रवास करणाºया विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे.
गंभीर बाब ही की, मानव विकास मिशनच्या आयुक्तालयाकडून या बसेसचा सर्व खर्च दिला जातो. त्यात चालक, वाहकाचे वेतनही समाविष्ठ आहे. मात्र या बसेसमध्ये वाहकच देण्यात येत नसल्याने मग मिशनकडून मिळणारे वाहकाचे वेतन जाते कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनमार्फत खास बसेसची व्यवस्था केली आहे. या बसमधून विद्यार्थिनींना मोफत प्रवास दिला जातो. वणी आगारातून अशा १७ बसेस सोडल्या जातात.
आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून झरी व मारेगाव तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी या बस सोडण्यात येतात. मात्र दररोज पाच ते सहा बसमध्ये वाहकच तैनात नसतो. बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनी प्रवास करतात. अशावेळी एकट्या चालकाच्या भरवशावर या विद्यार्थिनींना प्रवास करावा लागतो. झरी व मारेगाव तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहे. हा भाग जंगलाने व्यापला असून या जंगलामध्ये वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.
सायंकाळी एखादवेळी या दुर्गम भागात बसमध्ये बिघाड झाल्यास एकटा चालक, अशावेळी काहीही करू शकणार नाही. अगोदरच महामंडळाच्या बसेसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे बसेस केव्हाही बंद पडतात. अशा स्थितीत वाहक चालकाला एकट्याने विद्यार्थिनींची ने-आण करावी लागत आहे. नियमानुसार चालक व वाहकाला दर दिवशी १६० किलोमीटर वाहन चालवावे लागते. मात्र नियम डावलून या वाहक व चालकांना २०० ते २२५ किलोमीटरपर्यंत बस घेऊन पाठविल्या जात आहे. यामुळे वाहक, चालक कमालीचे वैतागले आहे. नियमानुसार वाहकाविना बस आगाराबाहेर सोडता येत नाही.
काम १६ तास, वेतन मात्र आठ तासांचेच
महामंडळात कार्यरत चालक व वाहकाने आठ तास ड्युटी करण्याचा नियम आहे. त्याचे वेतनही महामंडळाकडून दिले जाते. मात्र वणी आगारात चालक वालकांना १६-१६ तास ड्युटी करावी लागते. परंतु वेतन केवळ आठ तासांचेच दिले जाते.