वणी शहरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Published: June 25, 2017 12:18 AM2017-06-25T00:18:18+5:302017-06-25T00:18:18+5:30

शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही,

Woe for water in Bani city | वणी शहरात पाण्यासाठी हाहाकार

वणी शहरात पाण्यासाठी हाहाकार

Next

पुरवठा ठप्प : नागरिकांची तारांबळ, नवरगाव धरणातून पाणी सोडण्यास विलंब
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही, तर शनिवारी संपूर्ण शहरातीलच पाणी पुरवठा ठप्प होता. परिणामी शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असतानाही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
गंभीर बाब ही की, वणी नगरपालिकेने २१ जून रोजी नवरगाव धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याबाबतस पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. मात्र २२ जूनला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वणी शहरातील पाणी समस्येने उग्ररुप धारण केले. २२ जून रोजी सोडण्यात आलेले पाणी शनिवारी सायंकाळी ४ वाजता वणीतील नदीपात्रात पोहचले. रविवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मागील वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली होती. यंदाही हवामान खात्याचे सारे अंदाज चुकवत पावसाने दडी मारली. अद्याप वणी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी निर्गुडा नदीचे पात्र आटले आहे. गरजेनुसार, नवरगाव धरणातून पाणी मागितले जात आहे. नवरगाव धरणातही केवळ २.५६ दलघमी मिटर जलसाठा शिल्लक असल्याने नजिकच्या काळात पाऊस न आल्यास या धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वणी शहरात शुक्रवारी सकाळी व सायंकाळी काही भागात पाणी पुरवठा झाला. काही भागात हा पुरवठा अल्प होता. मात्र शनिवारी सकाळी नळाद्वारे पाणीच आले नाही आणि घरातील पाणीसाठाही संपुष्टात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक नागरिकांनी आपल्या परिसरातील नगरसेवकांना पकडून याबाबत जाब विचारला. लोकांचे समाधान करता करता नगरसेवकांच्या तोंडाला चांगलाच फेस आला. २४ जून रोजी रोहीणी नक्षत्राला प्रारंभ झाला. त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने अल्पसा दिलासा दिला. आजवर केवळ १०८ मि.मी.पाऊस कोसळला. या पावसाने मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणात केवळ एक से.मी. पाण्याची पातळी वाढली. मृग नक्षत्रात मात्र फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे स्थिती अधिक बिकट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पिभवन वेगाने होत असून त्यामुळे जलस्तरात घट होत आहे. वणी नगरपरिषदेने आतापर्यंत नवरगाव धरणातून चार हजार दलघमी पाणी घेतले आहे. आता मोजकेच आरक्षित पाणी शिल्लक आहे.

संकटांची मालिका
मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वणी परिसरात अवकाळी वादळी पावसाने थैैमान घातले. तेव्हापासून वणीच्या जलशुद्धीकरण केंद्रात संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. कधी वीज पुरवठा खंडित तर कधी नदीपात्रात पाणीच नाही, अशी स्थिती अनेकदा उद्भवत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

 

Web Title: Woe for water in Bani city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.