खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 04:46 PM2022-04-11T16:46:23+5:302022-04-11T16:53:18+5:30
चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला.
ढाणकी (यवतमाळ) : उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील ढाणकी ते बिटरगाव (बु.) रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यामुळे ऑटो रिक्षातून प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. मात्र, खराब रस्त्यामुळे बाळ आणि बाळंतीण या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली.
नताशा अविनाश ठोके (३०, रा. मन्याळी) असे मृत महिलेचे नाव आहे. बंदी भागातील मन्याळी येथील रहिवासी नताशा यांना रविवारी असह्य प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना ऑटो रिक्षातून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळच्या सुमारास काही कुटुंबीय व नताशा ऑटोरिक्षाने बिटरगाव येथून ढाणकीकडे निघाल्या. खराब रस्त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. ढाणकीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला.
मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ढाणकी ते बिटरगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा नागरिकांनी आंदोलन केले. बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही. परिणामी, या खड्डेमय रस्त्यामुळे एक विवाहिता आणि तिच्या नवजात बाळाचा बळी गेला. तरीही प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. आणखी किती बळी घेतल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वीही अनेकदा अनेक महिलांची खड्ड्यांमुळे रस्त्यातच प्रसूती झाली. रविवारची घटना मात्र सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.
वेळेवर उपचार मिळालेच नाही
बंदी भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतेही प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी प्रचंड विलंब लागतो. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रविवारी सुद्धा प्रसूतीसाठी ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या नताशा व तिच्या बाळाचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बळी गेला. रस्ते व्यवस्थित असते तर ती पीएचसीमध्ये पोहोचू शकली असती, वेळेवर तिच्यावर उपचार झाले असते. परिणामी, आज ती आणि तिचे बाळ सुखरूप राहिले असते. मात्र, रस्त्याच्या दुर्दशेमुळे दोघांचेही बळी गेल्याने समाजमन सुन्न झाले. या घटनेने बंदी भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेवरून बोध घेऊन शासनाने या भागातील रस्त्यांची तातडीने किमान दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नताशा व तिच्या नवजात बाळाच्या मृत्यूमुळे मन्याळी गावात शोकाकुल वातावरण आहे.