पाणीटंचाईने घेतला माळेगावात महिलेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:57 PM2019-06-11T23:57:01+5:302019-06-11T23:57:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील ३० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. कंत्राटदाराच्या दावणीला असलेले प्रशासन टंचाई नियोजनात सपशेल अपयशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील ३० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. कंत्राटदाराच्या दावणीला असलेले प्रशासन टंचाई नियोजनात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे माळेगाव येथे विहीरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी आहे. ग्रामस्थांनी महिलेच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच दुर्लक्ष करणाºया अधिकाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले.
विमल साहेबराव राठोड (४०) या महिलेचा सोमवारी ४५ फूट विहिरीत पडून मृत्यु झाला. गावात पाणी नसल्याने महिलांना पायपीट करावी लागते. या घटनेमुळे ग्रामस्थ प्रशासनावर भडकले आहे. त्यांनी महिलेचा मृतदेह माळेगाव येथील बसस्थानकासमोर ठेवला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे विमल राठोड यांच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी वृत्त लिहीपर्यंत झाली नव्हती.
पाणी टंचाईवर मात करण्याचे कारण पुढे करून प्रशासनाने सहा विहीरींचे अधिग्रहण केले. अधिग्रहण केलेल्या विहिरी कोरड्या आहे. आर्थिक हितसंंबंधातून स्थानिक अधिकारी चुकीचे नियोजन करतात. याचाच फटका ग्रामस्थांना बसतो. माळेगाव येथेही हाच प्रकार घडला. ग्रामस्थांनी पंचायत समिती, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना वारंवार पाणी टंचाई उपाययोजनेसाठी निवेदने दिली. त्यानंतरही कागदोपत्री विहीर अधिग्रहण दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
माळेगाव येथे चार विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पुसद उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अद्यापही अंत्यविधी झाला नाही.
- एस.बी. मनवर, प्रभारी गटविकास अधिकारी.
माळेगाव येथील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव अद्यापही तहसील कार्यालयाकडे आलेला नाही. आतापर्यंत तालुक्यात २५ विहीरींचे प्रस्ताव आले आहे. आता नवीन प्रस्तावात माळेगावचा समावेश करण्यात आलेला नाही.
- नीलेश मडके, तहसीलदार, महागाव
पंचायत समितीचे काम ढेपाळले आहे. अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. सभापती प्रभारी गटविकास अधिकारी जनतेच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करतात. यामुळे राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहे.
- संजय राठोड, उपसभापती, महागाव