गर्भातील अंकुराचे आता काय होईल? विवंचनेतून प्रेयसीने मृत्यूला कवटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:49 AM2023-02-21T11:49:28+5:302023-02-21T11:50:06+5:30

कळमनातील घटना : दगाबाज प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

woman commits suicide in yavatmal | गर्भातील अंकुराचे आता काय होईल? विवंचनेतून प्रेयसीने मृत्यूला कवटाळले

गर्भातील अंकुराचे आता काय होईल? विवंचनेतून प्रेयसीने मृत्यूला कवटाळले

Next

वणी (यवतमाळ) : त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. ती आठ महिन्यांची गर्भवती राहिली. त्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नाचा हट्ट धरला. मात्र, त्याने लग्नासाठी नकार दिला. यामुळे ती निराश झाली. आता गर्भातील अंकुराचे पुढे काय होईल, या विवंचतून प्रेयसीने विष प्राशन केले. रविवारी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान तिचे निधन झाले. सोमवारी शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सचिन नवले याला या प्रकरणी अटक केली.

श्वेता तुकड्यादास पवार (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे. शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळमना येथील रहिवासी सचिन रमेश नवले (३०) याने त्याच गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या श्वेताला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपण लवकरच लग्न करू, अशी थाप मारून त्याने तिचा विश्वास संपादन केला. तिनेही मोठ्या विश्वासाने त्याला आपले सर्वस्व अर्पण केले. गेल्या दोन वर्षांपासून सचिन तिचे शारीरिक शोषण करीत होता. यातून तिला गर्भधारणा झाली. ती आठ महिन्यांची गरोदर होती. ही बाब मात्र कुणालाही कळली नाही. गेल्या काही दिवसांपासून तिने लग्नासाठी सचिनकडे हट्ट धरला. मात्र, ऐनवेळी सचिनने लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे श्वेताला धक्काच बसला. पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या भवितव्याचे काय, या प्रश्नाने ती कमालीची अस्वस्थ झाली. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’लाच सायंकाळी तिने विष प्राशन केले. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला तत्काळ चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विष प्राशन केल्याने तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ १९ फेब्रुवारीला श्वेतानेही अखेरचा श्वास घेतला. सोमवारी तिच्या पार्थिवावर कळमना येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर या प्रकरणी तिच्या वडिलांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन नवले याच्याविरुद्ध भादंवि ३७६, २ (एन), ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे करीत आहेत.

Web Title: woman commits suicide in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.