चालत्या बैलबंडीव वीज पडून महिलेचा मृत्यू, दोघे थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 04:10 PM2023-09-04T16:10:05+5:302023-09-04T16:11:47+5:30
मारेगावच्या गोरज शिवारातील घटना
संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : शेतातील कामे आटोपून बैलबंडीने घरी परत जात असताना अंगावर वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारात घडली. यात सुदैवाने पती आणि एक व्यक्ती बचावले असून बैलाला किरकोळ ईजा झाली.
सुवर्णा संजय कांबळे (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला तिचा पती संजय महादेव कांबळेसह शेतातील काम आटोपून शेतमजूर मोहन नानाजी काळे याच्यासह बैलबंडीत बसून घरी परत येत होते. याच दरम्यान, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. अशातच गोरज फाट्याजवळ त्यांच्या बंडीवर अचानक वीज कोसळली. यात सुर्वणा कांबळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पती संजय कांबळे आणि सोबत असलेला मोहन काळे हे दोघेही विजेच्या धक्क्याने जागेवरच बेशुद्ध पडले. मात्र या दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बैलबंडीला जुंपून असलेल्या दोन बैलांपैकी एका बैलाला इजा होऊन बैलही खाली कोसळला.
मृत सुवर्णा कांबळे हिच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मागील अनेक दिवसांपासून परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. रविवारी ३ सप्टेंबरपासून या भागात पावसाची अचानक एन्ट्री झाली. सोमवारी विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस कोसळला.