घराला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 09:41 PM2022-03-31T21:41:52+5:302022-03-31T21:42:24+5:30

Yawatmal News मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पहिल्या माळ्यावर झोपेत असलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर बहीण भाऊ जखमी झाल्याची घटना येथे घडली.

Woman dies in house fire | घराला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू

घराला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू

Next
ठळक मुद्देबहीण-भाऊ जखमी

यवतमाळ : शहरातील गणेश चौकातील घराला गुरुवारी रात्री १.१५ वाजता आग लागली. या आगीने काही मिनिटात रौद्ररुप धारण केले. अंत्यविधीचे साहित्य विक्रीचा व्यवसाय असल्याने गवत, लाकूड, बांबू याने पेट घेतला. या आगीत पहिल्या माळ्यावर झोपून असलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मदतीसाठी सर्वच जण प्रयत्न करीत असताना आगीमुळे कुणालाही पुढे जाता येत नव्हते. काही मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. आगीत बहीण-भाऊही जखमी झाले आहे.

रेखा विनोद पुट्टेवार (५६) असे मृत महिलेचे नाव आहे, तर प्रगती व यश प्रमोद पुट्टेवार असे जखमी झालेल्या बहीण-भावांची नावे आहेत. पुट्टेवार कुटुंबातील दोन्ही भावांचे निधन झाल्याने रेखा व ज्याेती या दोन जावा व्यवसाय करून कुटुंब चालवत होत्या. अंत्यविधी साहित्य विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. त्यासाठी घरासमोरच बांबू, गवत, गवऱ्या व इतर साहित्य ठेवलेले होते. रात्री अचानक या साहित्याने पेट घेतला. जवळ भूमिगत वीजजोडणीची पेटी आहे. यातून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आगीने पूर्ण घर जळून राख झाले. पहिल्या मजल्यावर रेखा पुट्टेवार खोलीत झोपल्या होत्या. जमिनीवरच्या साहित्याने पेट घेतल्यानंतर आगीच्या ज्वाळा पहिल्या मजल्यावरील खोलीपर्यंत पोहोचल्या. दरवाजे, खिडक्यांनी पेट घेतला. चारही बाजूंनी आगीचे लोट उठले होते. यामुळे उष्णतेने व धुराने गुदमरून रेखा पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी धडपणाऱ्या यश आणि प्रगती या दोघांचेही हात भाजले. प्रत्येक जण आग विझविण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. परिसरात घरे दाटीवाटीने आहेत. त्यामुळे इतरत्र आग पसरण्याचा धोका वाढला. १ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. पाच मिनिटांत अग्निशमन बंब हजर झाला. सलग पाच बंब रिकामे केल्यानंतर आग नियंत्रणात आली. मात्र तोपर्यंत जवळपास २० लाखांचे नुकसान या आगीत झाले आहे.

मुलीच्या लग्नाची होती तयारी

ज्योती पुट्टेवार यांची मोठी मुलगी प्रगती हिचे लग्न जुळले आहे. त्याची तयारी पुट्टेवार कुटुंब करीत होते. लग्नासाठीचा कपडा, किराणा घरी आणला होता. तोही या आगीत जळून खाक झाला आहे. तीन वर्षांपूर्वी लोखंडी पूल परिसरात आगीने घर पेटले. यात चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला. ही आग दिवसा लागली होती. त्याची आठवण गुरुवारच्या घटनेने ताजी केली.

Web Title: Woman dies in house fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग