मुलीच्या लग्नाआधीच घडले विपरीत; घराला लागलेल्या आगीत काकूचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 02:54 PM2022-03-31T14:54:27+5:302022-04-01T16:37:34+5:30
शहरातील गणेश चौकातील घराला गुरुवारी रात्री १.१५ वाजता आग लागली. पाहता पाहता धुराचे लोट उठले व पुढच्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.
यवतमाळ : घरात मंगलकार्य असल्याने पुट्टेवार कुटुंबीय उत्साहात होते. किराणा, कपडे आदि साहित्य आणून ठेवले होते. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागली व आनंद दु:खात बदलून गेला. या घटनेत मुलीच्या काकूचा होरपळून मृत्यू झाल्याने पुट्टेवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
शहरातील गणेश चौकातील घराला बुधवारी रात्री १.१५ वाजता आग लागली. या आगीने काही मिनिटातच रौद्ररुप धारण केले. मदतीसाठी सर्वच जण प्रयत्न करीत असताना आगीमुळे कुणालाही पुढे जाता येत नव्हते. या आगीत पहिल्या माळ्यावर झोपून असलेल्या रेखा विनोद पुट्टेवार (५६) यांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रगती व यश प्रमोद पुट्टेवार हे बहीण-भाऊ जखमी झाले.
पुट्टेवार कुटुंबातील दोन्ही भावांचे निधन झाल्याने रेखा व ज्याेती या दोन जावा व्यवसाय करून कुटुंब चालवत होत्या. अंत्यविधी साहित्य विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. त्यासाठी घरासमोरच बांबू, गवत, गवऱ्या, लाकूड व इतर साहित्य ठेवलेले होते. रात्री अचानक या साहित्याने पेट घेतला, व आगीने रौद्ररुप धारण केले. घराजवळ भूमिगत वीजजोडणीची पेटी आहे. यातून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
या आगीत संपूर्ण घर जळून राख झाले. पहिल्या मजल्यावर रेखा पुट्टेवार खोलीत झोपल्या होत्या. जमिनीवरच्या साहित्याने पेट घेतल्यानंतर आगीच्या ज्वाळा पहिल्या मजल्यावरील खोलीपर्यंत पोहोचल्या. दरवाजे, खिडक्यांनी पेट घेतला. चारही बाजूंनी आगीचे लोट उठले होते. यामुळे उष्णतेने व धुराने गुदमरून रेखा पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी धडपणाऱ्या यश आणि प्रगती या दोघांचेही हात भाजले.
प्रत्येकजण आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. या परिसरात घरे दाटीवाटीने आहेत. त्यामुळे इतरत्र आग पसरण्याचा धोका वाढला. १ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. पाच मिनिटांत अग्निशमन बंब हजर झाला. सलग पाच बंब रिकामे केल्यानंतर आग नियंत्रणात आली. मात्र तोपर्यंत जवळपास २० लाखांचे नुकसान या आगीत झाले होते.
मुलीच्या लग्नाची होती तयारी
ज्योती पुट्टेवार यांची मोठी मुलगी प्रगती हिचे लग्न जुळले आहे. त्याची तयारी पुट्टेवार कुटुंब करीत होते. लग्नासाठीचा कपडा, किराणा घरी आणला होता. तोही या आगीत जळून खाक झाला आहे. अशीच एक घटना तीन वर्षांपूर्वी लोखंडी पूल परिसरात घडली होती ज्यात घराला लागलेल्या आगीत एका चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला. ही आग दिवसा लागली होती. त्याची आठवण गुरुवारच्या घटनेने ताजी केली.