‘वसंत’च्या ‘एमडी’ला महिलेने दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:54 AM2017-07-19T00:54:44+5:302017-07-19T00:54:44+5:30
कामगाराच्या मृत्यूनंतरही सेवानिवृत्ती वेतन देण्यास होणारी दिरंगाई आणि मुलाला निलंबित करण्यात आल्याने
पोफाळी ठाणे : सेवानिवृत्ती वेतनात दिरंगाई
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : कामगाराच्या मृत्यूनंतरही सेवानिवृत्ती वेतन देण्यास होणारी दिरंगाई आणि मुलाला निलंबित करण्यात आल्याने संतप्त झालेल्या एका महिलेने वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला चांगलाच चोप दिला. परस्परविरुद्घ तक्रारी देऊनही पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
वसंत साखर कारखान्याच्या उत्पादन विभागात प्रकाश काशीनाथ राठोड कार्यरत होते. २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पत्नी आशा राठोड गत दोन वर्षांपासून सेवानिवृत्ती वेतनासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांचा मुलगा प्रमोद राठोड यालाही कारखान्याने निलंबित केले. परंतु कारखाना प्रशासनाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पैशाचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळाले नाही. कार्यकारी संचालकांच्या सूचनेनुसार स्वाक्षरी करता येणार नाही, असे मुख्य लेखापालाने सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या आशाबाई कार्यकारी संचालक राजेंद्र खडप यांच्या कार्यालयात गेल्या. त्या ठिकाणी वाद होऊन आशाबाईने कार्यकारी संचालकाला चांगलाच चोप दिला.
दरम्यान, कार्यकारी संचालक राजेंद्र खडप यांनी आशा राठोड आणि मुलगा प्रमोद राठोड यांच्याविरुद्ध पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर कार्यकारी संचालकाविरुद्घ आशाबाईने तक्रार दिली. तुर्तास कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे ठाणेदारांनी सांगितले.