पाण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:42 PM2018-03-09T23:42:15+5:302018-03-09T23:42:15+5:30
शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या.
पिंपळगावात टँकर चालकाला बदडले
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या. वडगाव रोड परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तर सिंघानियानगरात महिलांनी ड्रमसह रस्त्यावर ठिय्या दिला. पिंपळगाव येथे तर महिलांचा दुर्गावतार दिसून आला. पाणी वाटपावरून महिलांनी चक्क टँकर चालकालाच बदडले.
यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील निरोहीनगर, सारंग सोसायटी, प्रगती सोसायटी, वृंदावननगर, धनलक्ष्मीनगर परिसरात महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शुक्रवारी दुपारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकल्या. तेथे कार्यकारी अभियंता अजय बेले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेल्याचे समजले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महिला निघाल्या असता जीवन प्राधिकरणाच्या प्रवेशद्वारावरच बेले दिसताच घेराव घातला. तब्बल तासभर हा घेराव सुरू होता.
दरम्यान पिंपळगाव परिसरात पाणी वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप महिलांनी केला. या ठिकाणी पाणी वितरणासाठी आलेल्या टँकर चालकाला चांगलेच बदडले. यामुळे काही तणाव निर्माण झाला होता. तर सिंघानियानगरात महिला पाण्याचे रिकामे ड्रम घेऊन रस्त्यावर ठिय्या देऊन टँकरची प्रतीक्षा करीत होत्या.
नगराध्यक्षांंनी केली गोखी प्रकल्पाच्या पाण्याची मागणी
यवतमाळातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी लोहारा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाºया गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. टंचाई उग्ररुप धारण केले असून तातडीची उपाययोजना म्हणून लोहारा एमआयडीसीतून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत गोखीचे पाणी आणण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. पूर्वी या प्रकल्पातून दर्डानगर टाकीद्वारे पाणी आणले जात होते. पुन्हा ही पाईपलाईन कार्यान्वित करून एक महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच वडगाव, लोहारा, वाघापूर, दर्डानगर, दारव्हा रोड या परिसरातही पाणी देता येईल. उर्वरित भागासाठी या टाकीवरून टँकरद्वारे पुरवठा करता येणे शक्य असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याशिवाय पाईपलाईनच्या खर्चासाठी १४ व्या वित्त आयोगातून नियोजन करण्याची मागणी केली आहे. यामुळे निळोणा, चापडोह व गोखी अशा तीन प्रकल्पातून टंचाईवर मात करता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे.