प्रसूत महिलेला झोपवले जमिनीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:20 AM2018-04-17T00:20:03+5:302018-04-17T00:20:55+5:30
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूती वॉर्डात महिलांना अमानुष वागणूक मिळते. याच्या अनेक तक्रारी होऊनही समस्या कायम आहे. रविवारी रात्री प्रसूत महिलेला चक्क जमिनीवर झोपविण्यात आले. हा प्रकार वॉर्ड क्र.७ मध्ये घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूती वॉर्डात महिलांना अमानुष वागणूक मिळते. याच्या अनेक तक्रारी होऊनही समस्या कायम आहे. रविवारी रात्री प्रसूत महिलेला चक्क जमिनीवर झोपविण्यात आले. हा प्रकार वॉर्ड क्र.७ मध्ये घडला.
पूजा किशोर शिंदे (२०) रा.तिवरंग ता.महागाव या महिलेची नऊ दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली. तिला पुढील उपचारासाठी वॉर्ड क्र.७ मध्ये दाखल केले. येथे रविवारी रात्री पूजाला पलंगावरून उतरविले. इतकेच नव्हे तर तिला जमिनीवर झोपण्यासाठी बिछाणाही देण्यात आला नाही.
मागील काही दिवसांपासून प्रसूतीदरम्यान अमानुष्य वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी येत आहे. येथील काही महिला कर्मचारी प्रसवकळा सोसत असलेल्या महिलांशी क्रूरपणे वागतात. सर्वसाधारण कुटुंबातील महिला हा प्रकार निमूटपणे सहन करीत आहेत. ग्रामीण भागातील गरीब, निरक्षर कुटुंबांना तक्रार करणे माहीत नसल्याने त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. प्रसूती वॉर्डात क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याने लक्षही दिले जात नाही. बरेचदा महिलांना बेडही उपलब्ध होत नाही. येथील सोयीसुविधांचा विस्तार करण्याची नितांत गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यातील व लगतच्या अमरावती, वाशीम जिल्ह्यातून महिला येथे दाखल होतात.
ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रस्तरावर प्रसूतीचे प्रमाण नगण्य आहे. गावपोडावरून आशा स्वयंसेविका मजुरी करणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करतात. त्यांचीही येथील यंत्रणेकडून हेळसांड केली जाते. कामाचा व्याप जास्त असल्याचे कारण पुढे करून तेथे प्रत्येकजण जबाबदारी झटकण्याच्या भूमिकेत वावरत असतो. येथे रुग्णांची नेहमी हेळसांड होत असल्याची ओरड असते.