इथे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न कराल तर.. धमकी देत 'ती' चक्क रचलेल्या सरणावर जाऊन बसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2022 11:57 AM2022-11-25T11:57:06+5:302022-11-25T12:07:57+5:30

दोन गटात राडा, १४ जणांवर गुन्हे दाखल

woman opposes the cremation by sitting on a pyre at pusad tehsil; clash between two groups, crimes against 14 people | इथे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न कराल तर.. धमकी देत 'ती' चक्क रचलेल्या सरणावर जाऊन बसली

इथे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न कराल तर.. धमकी देत 'ती' चक्क रचलेल्या सरणावर जाऊन बसली

Next

पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील बोरगडी येथील स्मशानभूमित एका महिलेच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या व शहरातील नामांकित डॉक्टरांची पत्नी चक्क सरणावर जाऊन बसल्या. ही जागा आपली असल्याचा दावा करून त्यांनी अंत्यसंस्काराला मज्जाव केला. यातून राडा झाला अन् दोन्ही गटातील १४ जणांवर अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

बोरगडी येथील शकुंतलाबाई साहेबराव ढगे यांचे आजाराने निधन झाले. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या एफ क्लास जमिनीवरील स्मशानभूमित सरण रचण्यात आले. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या तसेच नामांकित डॉक्टरांच्या पत्नी आशाबाई भानुप्रकाश कदम यांनी कौशल्याबाई गोदाजी मुळे, अशोक देवराव चंद्रवंशी, विक्रम आनंदराव चंद्रवंशी, नकुल भानूप्रकाश कदम यांच्यासह अंत्यसंस्काराची जागा गाठली. त्यांनी अंत्यसंस्कार करता येणार नाही, ही जमीन आमची आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न कराल तर परिणाम वाईट होतील, अशी धमकी देत अक्षरशः आशाबाई कदम रचलेल्या सरणावर जाऊन बसल्या.

या घटनेमुळे अंत्यसंस्काराला आलेला शोकाकूल जनसमूह अवाक् झाला. गावकऱ्यांनी कदम यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ऐकत नव्हत्या. गावातील काही महिलांनी आशाबाई यांना सरणावावरून खाली उतरवित शकुंतलाबाईंचा मृतदेह सरणावर ठेवला. याप्रकरणी गोधडीचे सरपंच रवींद्र सुदाम ढगे यांनी संगनमताने गैर कायद्याची मंडळी जमवून बेकायदेशीरपणे अंतिम संस्कार करण्यास मज्जाव केला व वादविवाद करून मृतदेहाची कदम व सहकाऱ्यांनी विटंबना केल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भादंवि १४३, १४९, ५०४, ५०६ सहकलम ३(१), आर (एस), ३(१), व्ही, ३(२),(व्ही-ए) कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरात शांतता राहावी यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत.

दुसऱ्या गटातील ९ जणांवर गुन्हे

याच प्रकरणात आशाबाई भानुप्रकाश कदम यांनीसुद्धा पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी आपल्या शेतातील वहितीच्या रानात सरण रचून मृतदेह आणल्याचे म्हटले. शेताच्या बाजूला स्मशानभूमी असताना शेतात अंत्यविधी का करता, अशी विचारणा केली. मात्र, शरद ढेंबरे याने धक्काबुक्की करून ही जमीन शासनाची असल्यामुळे आम्ही अंत्यविधी करीत असून तू ऐकत नसशील तर तुला यात फुंकून देऊ, असे म्हणून हात मुरगळला व गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र ओढून घेतल्याचा आरोप केला. तसेच सरणाकडे ढकलून देत शिवीगाळ करण्यात आली.

कुंटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद केले. त्यावरून दुसऱ्या गटातील शरद दत्ता ढेंबरे, हरी दादाराव पुलाते, नामदेव लक्ष्मण ढगे, रवी सुदाम ढगे, अरुण वसंता लोखंडे, मोतीराम पाईकराव, दादाराव पुलाते, संजय खडसे, वसंता पाईकराव या नऊ जणांवर भादंवि १४३, १४७, १४८, ३२४, ३९२, ३५४, ३४२, ५०४ कलमानुसार नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोमणे करीत आहे.

Web Title: woman opposes the cremation by sitting on a pyre at pusad tehsil; clash between two groups, crimes against 14 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.