सावित्रीच्या हजारो लेकींसाठी नाही एकही 'सावित्री'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 02:40 PM2022-01-03T14:40:23+5:302022-01-03T15:32:59+5:30

जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे.

woman teacher not available in 11 hundred schools in yavatmal | सावित्रीच्या हजारो लेकींसाठी नाही एकही 'सावित्री'

सावित्रीच्या हजारो लेकींसाठी नाही एकही 'सावित्री'

Next
ठळक मुद्देकाळ बदलला तरी विद्यार्थिनींची कुचंबणा११४१ शाळांमध्ये शिक्षिका नेमण्याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

अविनाश साबापुरे

यवतमाळ : आई-वडिलांना सोडून दिवसभर शाळेत राहणाऱ्या मुलींना विविध प्रकाराच्या शारीरिक, मानसिक, भावनिक समस्या भेडसावतात. मात्र त्या शेअर करण्यासाठी त्यांच्या शाळेत एकही महिला शिक्षिका नाही. त्यामुळे गुणवत्तेत तरबेज असलेल्या मुली मानसिक कुचंबणेपायी अभ्यासात मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. एक-दोन नव्हे तर जिल्ह्यातील ११४१ शाळांमध्ये शिक्षिका नसल्याचे गंभीर वास्तव आहे.

आदिवासी, दुर्गम असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दळणवळणासह विविध भौतिक सुविधांचा अभाव असतानाही दोन लाख ४३ हजार ९६४ ग्रामीण मुली शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आई-वडील रोजमजुरीला गेले तरी या मुली शिक्षणासाठी पायपीट करीत शाळेपर्यंत पोहोचतात. मात्र जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे.

गंभीर म्हणजे प्रामुख्याने खेड्यापाड्यातच असलेल्या १५५ अनुदानित शाळा आणि शहरी क्षेत्रात असलेल्या २७ विनाअनुदानित शाळांनाही महिला शिक्षिकांची नेमणूक गरजेची वाटलेली नाही. त्यामुळे मासिक पाळी, शारीरिक दुखणी आणि छेडखानीसंदर्भात मोकळेपणाने कुणाशी बोलावे ही समस्या विद्यार्थिनींना भेडसावत आहे. चालू वर्गात साधी लघुशंकेकरिता सुटी कशी मागावी हाही प्रश्न मुलींपुढे निर्माण होतो. अनेक मुली अशा काळात शाळेत जाणेच टाळतात. त्यातूनच जिल्ह्यात विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाणही कमी होण्याचे नाव घेत नाही.

विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने १९९५ च्या सुमारास गाव तिथे शाळा हे धोरण आखतानाच शाळा तिथे एकतरी शिक्षिका हेही धोरण आखले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात हे धोरण मातीमोल झाले आहे.

- जिल्ह्यातील एकूण शाळा : ३३४६

- एकही शिक्षिका नसलेल्या शाळा : ११४१

- जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक : १८२५३

- महिला शिक्षिकांची संख्या : ६५०४

- जिल्ह्यातील विद्यार्थिनी : २४३९६४

महिला शिक्षिका टाळणाऱ्या शाळा

जिल्हा परिषद : ९३९

शासकीय शाळा : २०

अनुदानित शाळा : १५५

विनाअनुदानित शाळा : २७

Web Title: woman teacher not available in 11 hundred schools in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.